✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | २० डिसेंबर २०२५ | “मी काहीच केलं नाही, तरी मोबाईल गरम का होतोय?” “बॅटरी क्षणात का संपतेय?” असे प्रश्न जर तुम्हालाही पडत असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जगभरातील तब्बल ३ अब्जांहून अधिक व्हॉट्सॲप युजर्सच्या खासगी आयुष्यावर डोळा ठेवणारे एक धोकादायक टूल समोर आले आहे. विशेष म्हणजे, हे टूल तुमच्याकडे एकही मेसेज पाठवत नाही, नोटिफिकेशन देत नाही… आणि तरीही तुमच्या हालचालींचा अंदाज घेत राहतं!
या धक्कादायक पद्धतीला ‘सायलेंट व्हिस्पर’ असं नाव देण्यात आलं आहे. सायबर सुरक्षेशी संबंधित एका संशोधकाने हे टूल तयार केलं असून, ते व्हॉट्सॲप आणि सिग्नलसारख्या एन्क्रिप्टेड अॅप्समधील एका सूक्ष्म कमकुवतपणाचा फायदा घेतं. अॅपवर मेसेज आला की, तो मिळाल्याचं कन्फर्मेशन क्षणार्धात पाठवलं जातं. हे कन्फर्मेशन इतकं वेगवान असतं की युजर्सच्या लक्षातही येत नाही. पण हल्लेखोर मात्र याच सेकंदांच्या फरकावर नजर ठेवतो.
या वेळेच्या हिशोबावरून फोन चालू आहे की बंद, युजर सध्या अॅक्टिव्ह आहे की झोपलेला, तो घरच्या वाय-फायवर आहे की बाहेर मोबाईल डेटावर – हे सगळं ओळखता येतं. म्हणजेच, तुमचं वेळापत्रक, झोप-उठण्याची वेळ, बाहेर जाण्याची सवय, हे सगळं कोणताही मेसेज वाचल्याशिवाय समोरच्या व्यक्तीला कळू शकतं.
धक्कादायक बाब म्हणजे, या सायलेंट हेरगिरीचा थेट परिणाम मोबाईलच्या बॅटरीवर होतो. सामान्य स्थितीत निष्क्रिय फोन तासाला १ टक्क्यापेक्षा कमी बॅटरी वापरतो. मात्र, या हल्ल्यादरम्यान आयफोन १३ प्रोची बॅटरी तब्बल १४ टक्के, आयफोन ११ ची १८ टक्के, तर सॅमसंग गॅलेक्सी S23 ची १५ टक्के प्रति तासाने घसरते. परिणामी फोन गरम होतो, डेटा झपाट्याने संपतो आणि व्हिडिओ कॉलसारखी साधी कामंही अडथळ्यात येतात.
या टूलच्या निर्मात्याचा दावा आहे की, हे केवळ संशोधनासाठी तयार करण्यात आलं आहे. मात्र, इंटरनेटवर उपलब्ध असलेलं कोणतंही टूल चुकीच्या हाती पडलं, तर त्याचा गैरवापर अटळच! म्हणूनच तज्ज्ञांचा सल्ला स्पष्ट आहे – अॅप्स नियमित अपडेट ठेवा, संशयास्पद बॅटरी ड्रेनकडे दुर्लक्ष करू नका आणि ‘एन्क्रिप्शन आहे म्हणजे पूर्ण सुरक्षित’ या गैरसमजात राहू नका.
कारण, आजकाल व्हॉट्सॲपवर मेसेज येण्याआधीच… कुणीतरी तुमच्यावर लक्ष ठेवत असू शकतं!
