भाजपा पाठोपाठ आता राष्ट्रवादीचाही लॉकडाऊनला विरोध ; मुख्यमंत्र्यांना म्हणाले…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – दि. २९ – मुंबई – विशेष प्रतिनिधी – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून त्यासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने राज्यात लॉकडाऊन करण्यास विरोध केला आहे. थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच राष्ट्रवादीने लॉकडाऊनला विरोध दर्शविला आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपपाठोपाठ सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीने थेट लॉकडाऊनला विरोध केल्याने मुख्यमंत्र्यांची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे. (NCP says lockdown not a solution to rising COVID-19 cases)

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लॉकडाऊन बाबतची राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. राज्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनचा विचार आला आहे. पण लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. तसा आग्रहच आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आला आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितलं.

आरोग्य सुविधा वाढवा

लॉकडाऊन हा राज्याला परवडणारा नाही. जनतेलाही परवडणारा नाही. त्यामुळे पर्याय होऊ शकत नाही. त्याऐवजी आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यात यावा अशी आमची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनीही प्रशासनाला आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या सूचना केल्या आहेत. लोकांनी अजून काळजी घेतली पाहिजे. नियम पाळल्यास कोरोना वाढणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *