महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. ३० मार्च । लॉकडाऊनची तयारी करण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयातून प्रसिद्ध होताच, भाजपचा मात्र लॉकडाऊनला विरोध असल्याचे मत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले आहे. लॉकडाऊन हा कोरोनावरील उपाय नसून, त्याचा फटका बसणाऱ्या असंघटित कामगारांना ५ हजारांचे पँकेज जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.
मागील लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक भरडले गेले ते सर्वसामान्य. त्यांना केंद्र सरकारनेही कोणतीही नुकसानभरपाई दिली नाही किंवा राज्य सराकरानेही. मात्र, सध्याच्या परिस्थितीत राज्य सरकारकडून लॉकडाऊनचे सुतोवाच होताच, विरोधात असलेल्या भाजपने लॉकडाऊनच्या विरोधाचे हत्यार उपसले आहे. राज्य सरकार सर्वसामान्यांना होणाऱ्या नुकसानीच्या बदल्यात सर्वसामान्यांना एक रुपयाचेही पँकेज देणार नसल्याने आपला त्यास कडवा विरोध राहील असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले आहे. शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी लॉकडाऊनला विरोध करण्याची भाजपची भूमिका जाहीर केली.
“देशाच्या अर्थव्यवस्थेत असंघटित कामगारांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू केले, तर त्याचा सर्वाधिक फटका हा असंघटित वर्गालाच बसेल. त्यामुळे त्यांना सर्वातआधी दर महिना पाच हजारांचे पॅकेज जाहीर करा, ‘ अशी मागणी पाटील यांनी राज्य सरकारकडे केली. असंघटित क्षेत्रातील हातावर पोट असणारे फेरीवाले, घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षाचालक, रोजंदारी कामगार यांना आधार देण्याची राज्य सरकारची जबाबदारी असून या मदतीशिवाय लॉकडाऊन लागू केल्यास भाजप रस्त्यावर उतरणार असल्याचे ते म्हणाले.
कोरोनाच्या वाढत्या संख्येवर लॉकडाऊन हे उत्तर नाही, असे प्रदेशाध्यक्ष पाटील यावेळी म्हणाले. “कोरोना संसर्गजन्य आजार आहे, हे जगमान्यच आहे. त्यामुळे खबरदारी घेणे हाच त्यावर उपाय आहे. नागरिकांनी मास्क लावणे, सतत हात सॅनिटायझर आणि साबणाने धुतलेच पाहिजेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन हे बंधनकारक आहे. त्यामुळे रात्रीची संचारबंदी करणे सारखे उपाय चालू शकतात. मात्र, पूर्णतः लॉकडाऊन करून काहीही साध्य होणार नाही’, असे चंद्रकांत दादा यावेळी म्हणाले.