महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. ७ एप्रिल ।महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोरोना प्रतिबंधक लस 25 वर्षांपुढील सर्वांना खुली करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. त्यांच्यापाठोपाठ इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. सध्या आपण 45 वर्षांपुढील लोकांना लस टोचतोय. देशात विषाणूच्या दुसऱया लाटेचा झपाटय़ाने होत असलेला फैलाव विचारात घेता कोरोना लसीकरणाला तत्काळ युद्धपातळीवर गती देण्याची सूचना आम्ही करतोय. लसीकरण मोहिमेत आमच्या सूचनांचे पालन करण्याबाबत विनंती करीत आहोत, असे मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे. देशात मागील तीन दिवसांत 90 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1 कोटी 26 लाख 86 हजार 049 वर गेली आहे. याच अनुषंगाने असोसिएशनने सरकारला सावध केले आहे.
कोरोना प्रतिबंधक लस सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार नाही असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज स्पष्ट केले. 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्यात यावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनसह विविध संघटनांनी केली आहे. कोरोना मृत्यू टाळणे आणि आरोग्य व्यवस्था सक्षम करणे हा कोरोना लसीकरणाचा पहिला उद्देश आहे. जगभरात ज्यांना गरज आहे त्यांना प्राधान्याने लस दिली जात आहे. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनमध्ये कोरोनाचा अधिक धोका असलेल्या वयोगटांनाच लस दिली जात आहे, असे भूषण यांनी सांगितले.
या सूचना केल्या
18 वर्षांपुढील सर्वांना कोरोना लस खुली करा.
खासगी रुग्णालयांप्रमाणे खासगी क्लिनिक्सनाही लसीकरण मोहिमेत सहभागी करून घ्या.
सार्वजनिक ठिकाणी प्रवेश तसेच सामान घेण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्र बंधनकारक करा.
सिनेमागृह, खेळ, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम आदी अत्यावश्यक सेवा नसलेल्या ठिकाणी मर्यादित काळाचे लॉकडाऊन करा.