महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. 7 एप्रिल – मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज बुधवारी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. सोन्याचा भाव २८२ रुपयांनी वाढला असून चांदीच्या किमतीत २९३ रुपयांची वाढ झाली आहे. सलग दोन सत्रात सोने ८०० रुपयांनी महागले आहे.
एमसीएक्सवर मंगळवारी सोन्याचा भाव ५६६ रुपयांनी वाढला होता. बाजार बंद होताना सोने ५६६ रुपयांनी वधारून ४५९१५ रुपयांवर स्थिरावले होते. आज बुधवारी सकाळच्या सत्रात सोन्यावर नफावसुलीचा दबाव दिसून आला. सोने १३४ रुपयांच्या घसरणीसह ४५५५१ रुपयांवर खुले झाले. मात्र त्यानंतर पुन्हा सोन्याची मागणी वाढली आणि सोन्याचा भाव वाढू लागला. सध्या एमसीएक्सवर सोने ४६२०० रुपये झाले असून त्यात २८१ रुपयांची वाढ झाली आहे.
सोन्याबरोबरच चांदीमध्ये देखील तेजी आहे. मंगळवारी एक किलो चांदीचा भाव १२९२ रुपयांच्या वाढीसह ६६१६९ रुपयांवर स्थिरावला होता. सध्या एमसीएक्सवर एक किलो चांदीचा भाव ६६२२५ रुपये असून त्यात ३२८ रुपयांची वाढ झाली आहे. दोन दिवसांत चांदी १६०० रुपयांनी महागली आहे.
Goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४३०० रुपये आहे तर २४ कॅरेटचा भाव ४५३०० रुपये आहे. त्यात मंगळवारच्या तुलनेत १०० रुपये वाढ झाली आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४८०० रुपये झाला आहे. त्यात २५० रुपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४८८७० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४२९७० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४६८९० रुपये आहे. त्यात ४४० रुपयांची वाढ झाली. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४६३० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७३२० रुपये आहे.