आयुष्यात कुठलीही परीक्षा ही शेवटची परीक्षा नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । नवीदिल्ली । दि. ८ एप्रिल । परीक्षा म्हणजे जणू काय एकूणच जीवन, अशा प्रकारचे भ्रामक वातावरण तयार करण्यात आलेले आहे. पालक हे या वातावरणातील सर्वांत मोठे आणि जबाबदार घटक आहेत. पाल्यांच्या परीक्षेचा पालकांनी ‘परीक्षा म्हणजे एकूण जीवन’ असा विचार करणे सोडून द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आयुष्यात कुठलीही परीक्षा ही शेवटची परीक्षा नाही. शालेय, शालांत परीक्षांचा वाटा एकूण जीवनात तर फार छोटासा असतो. विद्यार्थी, शिक्षक, पालक, नातेवाईक आणि मित्रमंडळींनी परीक्षांबाबतच्या या भ्रामक वातावरणातून बाहेर पडावे,असेही ते म्हणाले.

‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन केले. पंतप्रधान म्हणाले, आपण गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटाशी सामना करत आहोत. मलाही तुम्हाला भेटण्याचा मोह आवरत नव्हता. त्यामुळे मी एका एका नव्या फॉर्मेटमध्ये तुमच्यासमोर आलेलो आहे. तुमच्या चेहर्‍यावरील हास्य न दिसण्यामुळे माझे खूप नुकसान होत होतेे. सध्या परीक्षा आहेत. त्यामुळे आपण परीक्षांवर चर्चा करूया. यावर्षीही आपण ब्रेक घेणार नाही.

आज मुलांसाठी आई-वडिलांना वेळ नाही. मुलांची क्षमता जोखण्याचा एकमेव मार्ग म्हणून पालक परीक्षांमध्ये मुलांना मिळालेले गुण तेवढे बघतात. परीक्षेव्यतिरिक्‍तही आपल्या मुलांमध्ये असलेल्या अन्य गुणांकडे पालकांचे लक्षच जात नाही. परीक्षा ही अनेक संधींपैकी एक लहानशी संधी आहे, पण आपण परीक्षेकडे जीवन-मरणाचा विषय म्हणून बघतो. सर्वांनीच आता हे सोडून दिले पाहिजे, असे पंतप्रधानांनी सांगितले. ते म्हणाले, मी सांगतो त्या मार्गानेच जा, असे माझे म्हणणे नाही, मात्र मला आता तुम्हाला एका वेगळ्या परीक्षेसाठी तयार करायचे आहे. भारताला आत्मनिर्भर बनवण्याची ही परीक्षा आहे. जेव्हा तुमच्या बोर्ड परीक्षा संपतील तेव्हा सकाळपासून रात्रीपर्यंत कोणत्या वस्तू देशात तर कोणत्या परदेशात बनतात त्याचा अभ्यास करा. आपण या दिशेने काय करू शकतो, याचा विचार करा. परीक्षेत विशेष गुण मिळाले नाही, पण आपापल्या क्षेत्रांत उज्ज्वल यश मिळविणार्‍यांना आपला आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *