घरातच बसा, कारवाई टाळा; फक्त ‘यांना’ आहे प्रवासासाठी परवानगी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।पुणे । दि. १० एप्रिल । कोरोना नियंत्रणसाठी राज्य शासनाने लागू केलेल्या ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दोन दिवसांच्या कडक मिनी लॉकडाउनला सायंकाळपासून सुरूवात झाली आहे. शनिवारी आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद राहणार असून नियमांचे उल्लंघन करण्याऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर आज शहर आणि जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्यामुळे पोलिस प्रशासनाने ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे.

शहर आणि जिल्ह्यात दररोज 10 ते 11 हजार कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. रूग्णांची वाढती संख्या आणि साखळी तोडण्यासाठी कडक निर्बध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनो घरातच बसा, विनाकारण भटकंती करू नका, अन्यथा तुमच्यावर दंडात्मक कारवाईसह वाहनजप्तीच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. विनाकारण भटकंती करण्याऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह वाहनजप्ती केली जाणार आहे. नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. दरम्यान, कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला रूग्णालयात जाणाऱ्या नागरिकांची अडवणूक केली जाणार नाही. पंरतु, नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी मागितलेल्या कागदपत्रांची पुर्तता संबंधितांना करावी लागणार आहे. त्याशिवाय रुग्णांना डबा पोहोच करणे, औषधोपचारासाठी इतर ठिकाणी प्रवास करणे, रुग्णसोबत प्रवास करणाऱ्यांची कारवाईपासून सुटका करण्यात आली आहे.

घरातच बसण्याचे पोलिसांचे आवाहन
नागरिकांनी शनिवार आणि रविवारी घरातच बसले पाहिजे. विनाकारण घराबाहेर पडल्यास संसर्गाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्याशिवाय अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली काहीजणांकडून गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता आहे. नाकाबंदीदरम्यान तसे काही आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याच इशारा पोलिसांनी दिला आहे.

प्रवासासाठी यांना आहे परवानगी
-शनिवार आणि रविवार लग्न समारंभ असल्यास स्थानिक प्रशासनासह पोलिसांची परवानगी घेउनच सोहळा पार पाडता येणार आहे.
– परिक्षा देण्यासाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ओळखपत्र बाळगणे बंधनकारक आहे.
-औद्योगिक कामगारांना ओळखपत्रानुसार सोडले जाणार
-रेल्वे, विमान आणि बसेसने प्रवास करून शहरात येणाऱ्या नागरिकांना घरी जाण्यासाठी स्वतःजवळ अधिकृत तिकीट बाळगावे लागणार आहे.

‘कडक निर्बधाची अमंलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार विनाकारण भटकंती, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली फिरणे, विनामास्क प्रवास, कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई तीव्र केली जाणार आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांनी पुरावा दाखविल्यानंतर सोडले जाणार आहे. रूग्णसेवा, भाजीपाला, अत्यावश्यक सेवेतील वाहनचालकांना सुट दिली जाणार आहे.’

डॉ. रवींद्र शिसवे, सहपोलीस आयुक्त

‘ब्रेक द चेन अंतर्गत शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधाची प्रशासनाने तयारी केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद करण्यात येणार आहेत. त्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदार आणि प्रांतधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.’

डॉ. राजेंद्र देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *