महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।मुंबई । दि.१२ एप्रिल । राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाचे प्रमाण व साखळी थोपवण्यासाठी राज्यव्यापी संपूर्ण लाॅकडाऊनची आवश्यकता आहे, असे मत राज्य कोविड टास्क फोर्सच्या बहुंताश सदस्यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेतच्या पार पडलेल्या प्रदीर्घ बैठकीत मांडले. त्यामुळे बुधवार, १४ एप्रिल रोजी साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यात ८ ते १४ दिवसांचे लाॅकडाऊन लागण्याची दाट शक्यता आहे. व्हिडिओ काॅन्फरसिंगद्वारे ही बैठक पार पडली. या वेळी मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी होते. बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, टास्क फोर्सचे सदस्य डाॅ. संजय ओक, डाॅ. शशांक जोशी, डाॅ. अविनाश सुपे, डाॅ. झहीर उडवाडिया, डाॅ. वसंत नागवेकर, डाॅ. राहुल पंडित, डाॅ. ओम श्रीवास्तव आदी सहभागी झाले होते. टास्क फोर्सच्या बहुतांश सदस्यांनी कोरोना साखळी तोडण्यासाठी किमान १४ दिवस लाॅकडाऊन आवश्यक असल्याचे मत मांडले. यासंदर्भात मुख्यमंत्री बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करतील. १४ एप्रिलनंतर राज्यात ८ ते १४ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर करतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
लाॅकडाऊनच्या काळात हातावर पोट असणारे मजूर व कामगार यांना राज्य सरकारने मदत करावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांकडून होत आहे. तसेच लाॅकडाऊन लावण्यापूर्वी जनतेला तयारीसाठी पुरेसा अवधी मिळावा, अशी मागणी होत आहे. त्याचा विचार करून मुख्यमंत्री बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर निर्णय घेणार असल्याचे समजते. महाविकास आघाडीचे सरकार तीन पक्षांचे आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांचा लाॅकडाऊनला तीव्र विरोध होता. मात्र कोराेनाची सध्याची भयावह स्थिती पाहता या दाेन्ही पक्षांचा विरोध मावळला आहे.