महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।मुंबई । दि.१३ एप्रिल । गुढीपाडवा सण कोरोनाची दुसरी लाट असल्याने साधेपणाने साजरा करावा, अशी मार्गदर्शक सूचना राज्याच्या गृहविभागाने सोमवारी जारी केली. 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमू नये, कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका काढू नयेत, असे बजावण्यात आले आहे.
गुढीपाडव्यानिमित्त अनेक शहरांमध्ये पारंपरिक वेशभूषा करत स्वागतयात्रा काढल्या जात असतात. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसे करता येणार नाही. बाईक रॅली, प्रभात फेरी, मिरवणुका, दिंडी, पालखी सोहळे असे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम गुढीपाडव्यानिमित्त घेता येणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेतच गुढीपाडवा साजरा करण्यात यावा. घरी गुढी उभारुन हा सण साधेपणाने साजरा करावा. शारिरीक अंतर व स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे. शक्य असल्यास रक्तदानासारखी आरोग्य शिबिरे कोरोना नियमांचे पालन करून घेता येतील, असे गृह विभागाने काढलेल्या सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.