महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि.१३ एप्रिल । मागील आठवड्यापासून महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरला आहे. तर राज्यात ढगाळ वातावरण असल्याने सकाळपासूनच लोकांना उकाड्याचा त्रास होतं आहे. मागील आठवड्यात विदर्भात तापमानाच्या पाऱ्यानं देशातील उच्चांक गाठला होता. त्यामुळे यावर्षीचा उन्हाळा शरीराची लाहीलाही करणारा असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र अवकाळी पावसाच्या ढगांमुळे महाराष्ट्राला तूर्तास उष्णतेच्या लाटांपासून दिलासा मिळाला आहे. पण अवकाळी पावसाने धांदल उडण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली याठिकाणी अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. त्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रातही अवकाळी पावसाचे (maharashtra weather today) ढग दाटले आहेत. हीच स्थिती पुढील तीन दिवस कायम राहाणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. शिवाय मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. आज अहमदनगर, जालना, औरंगाबाद, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस (thunderstorm) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील तीन दिवस महाराष्ट्रात ढगाळ वातावरण कायम असणार आहे. भारतीय हवामान खात्यानं उपग्रहाद्वारे घेतलेल्या फोटोंत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगांच्या हालचाली नोंदल्या गेल्या आहेत. आज मराठवाड्यातील काही भागात वेगवाग वारा, विजांच्या कडकडासह अवकाळी पावसाची हजेरी लागू शकते, अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
२.३० PM
उपग्रहा द्वारे प्राप्त लेटेस्ट माहिती प्रमाणे, राज्याच्या आतल्या भागात वादळी ढगांची दाटी..
मराठवाडा भागात काही ठीकाणी थंडर स्टॉर्म ⛈🌩. pic.twitter.com/FIdbxZJIvw— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 13, 2021
त्याचबरोबर, आज उत्तर कोकण, दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. तर कोकण वगळता इतर भागात आज वारा 50 किमी प्रतितास वेगानं वाहणार आहे. तर पुढील तीन ते चार तासांत नाशिक, पुणे, अहमदनगर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली आणि रायगड या जिल्ह्यांमधील विविध ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.