मजुरांची मोठी गर्दी; रेल्वेनं केलं मजुरांना ‘हे’ आवाहन

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.१४ एप्रिल । राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून कठोर निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे. राज्यात कडक निर्बंध लागू करण्याआधीच परप्रांतियांनी गावाकडची वाट धरली आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर गावाकडे जाणाऱ्या मजुरांची मोठी गर्दी जमली होती.

करोनाची साखणी तोडण्यासाठी राज्यात आज रात्रीपासून कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. १ मेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. लॉकडाऊनच्या भीतीने मजुरांनी पुन्हा गावाकडे जाण्यासाठी धावपळ केली आहे. त्यामुळं रेल्वे स्थानकांत प्रचंड गर्दी झाली होती. या अचानक झालेल्या गर्दीमुळं सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला होता. तसंच, इतर मजुरांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळं अखेर मध्य रेल्वेनं मजुरांना पॅनिक होऊ नका, गाड्या सरुच राहतील, असं आवाहन केलं आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य पीआरओ शिवाजी सुतार यांनी ट्विट करुन हे आवाहन केलं होतं. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी पॅनिक होऊ नये. रेल्वे स्थानकांवर गर्दी करु नये. तसंच, समर स्पेशल ट्रेन सोडण्यात येत आहे, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

प्रवाशांना आवाहन आहे की पॅनिक होऊ नका व स्थानकांवर गर्दी करु नका. ट्रेन सुटण्याआधी ९० मिनिटं आधी रेल्वे स्थानकांवर या. रेल्वे वेटिंग लिस्ट वेळेवेळी तपासत आहे. अधिक आवश्यकता असल्यास अतिरिक्त स्पेशल ट्रेन सोडण्यात येतील, असं मध्य रेल्वेनं म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *