करोना : हरिद्वारमध्ये दोन दिवसांत १००० हून अधिक संक्रमित

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । हरिद्वार,। दि.१४ एप्रिल । आज बैसाखीच्या मुहूर्तावर हरिद्वारमध्ये कुंभमेळ्यातील तिसरं शाही स्नान पार पडतंय. शाहीस्नानासाठी हरिद्वारच्या ‘हर की पौंडी’मध्ये भाविकांनी एकच गर्दी केलेली दिसून येतेय. दरम्यान, कुंभमेळा २०२१ दरम्यान उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये मंगळवारी करोना संक्रमणाचे ५९४ नवीन रुग्ण आढळले आहेत. सोबतच शहरातील उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या २ हजार ८१२ वर पोहचलीय. या अगोदरच्या दिवशी म्हणजे, सोमवारी शहरात ४०८ करोनाबाधित सापडले होते.

करोनाबाधितांमध्ये अनेक यात्रेकरुंचा आणि साधुसंतांचाही समावेश आहे. कुंभमेळ्यात अनेक धार्मिक संघटनांच्या प्रमुखांनी करोना चाचणी करण्यास नकार दिल्याचंही समोर येतंय. मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जुना आखाड्याचे पाच, निरंजनी आखाड्याचे दोन, नाथ आणि अग्नि आखाड्याचे एक-एक साधू करोना संक्रमित आढळले आहेत.

गेल्या चार दिवसांत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष आणि निरंजनी आखाड्याचे प्रमुख नरेंद्र गिरी यांच्यासहीत १८ साधू करोना संक्रमित आढळले. नरेंद्र गिरी यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना हरिद्वारच्या एम्समध्ये हलवण्यात आलं.

देशात एकीकडे आरोग्य व्यवस्थेची पुरेशा सोई-सुविधांअभावी तारांबळ उडालेली असताना हरिद्वारमध्ये मात्र मोठ्या संख्येनं भाविक दाखल होत आहेत. देशात करोना संक्रमणाचा विस्फोट झालेला दिसून येत असताना हरिद्वारची ही गर्दी धडकी भरवणारी आहे. जवळपास एक महिनाभर चालणाऱ्या या कुंभमेळ्यात जवळपास १० लाख लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.

हरिद्वारमधून समोर आलेले फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर करोना गाईडलाईन्स आणि नियमांच्या कशाप्रकारे चिंधड्या उडवल्या गेल्या आहेत हे स्पष्टपणे दिसून येतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *