केंद्र सरकारने दिली Remdesivir चे उत्पादन दुप्पट करण्याची परवानगी, याच आठवड्यात होणार किंमती कमी

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । नवीदिल्ली । दि.१५ एप्रिल । कोरोनाच्या उपचारामध्ये अॅन्टी व्हायरल म्हणून उपयोगी पडणाऱ्या रेमडेसिवीरचे उत्पादन आता दुप्पट करण्याची परवानगी केंद्र सरकारने औषधं कंपन्यांना दिली आहे. त्यामुळे सध्या प्रत्येक महिन्यात होणारे 38.8 लाख रेमडेसिवीरचे उत्पादन आता 78 लाख होणार आहे. तसेच रेमडेसिवीरच्या किंमतीमध्येही घट करण्याची तयारी खासगी औषधं कंपन्यांनी दर्शवली आहे. त्यामुळे कोरोना विरोधातल्या लढाईला मोठा हातभार लागणार आहे अशी आशा व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणानंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा देशात जाणवत होता. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी धावपळ करावी लागत आहे. अनेक राज्यांकडून रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा तुटवडा असल्याची तक्रार येत होती. हीच परिस्थिती लक्षात घेत भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील रेमडेसिवीरचे उत्पादन दुप्पट करण्याच्या निर्णयाला फास्ट ट्रॅक अॅप्रूव्हलच्या माध्यमातून परवानगी देण्यात आली आहे. या आधी एक दिवस केंद्र सरकारने केमिस्ट दुकानातून याच्या विक्रीवर निर्बंध आणले होते. सरकारने सांगितलं होतं की फक्त हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात येईल. बाकी इतर ठिकाणी या इंजेक्शनचा वापर करण्यात येणार नाही.

रेमडेसिवीरचे उत्पादन दुप्पट करण्याच्या या निर्णयाने याच्या पुरवठ्यात वाढ होईल. त्यामुळे सध्या महाग असलेल्या या इंजेक्शनच्या किंमतीत 3500 रुपयांपेक्षाही कमी करण्याची तयारी औषधं कंपन्यांनी दर्शवली आहे.

महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांत रेमडेसिवीरचा मोठा तुटवडा जाणवत होता. तसेच देशातल्या इतर भागातही हीच परिस्थिती होती. त्यामुळे भारत सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात थांबवली आहे. देशातील कोरोना स्थिती सुधारेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. स्थानिक कंपन्या ज्या रेमडेसिवीर इंजेक्शनचं उत्पादन करतात त्यांना इंजेक्शनच्या साठ्याविषयीची माहिती वेबसाईटवर ठेवावी लागणार आहे. तसेच कोणत्या डीलरकडून डिस्ट्रिब्युशन होत आहे त्याची माहितीही कंपन्यांना द्यावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *