महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.१८ एप्रिल । नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या मध्यस्थीनंतर औषध कंपन्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किमती आज कमी केल्या. त्यामुळे गंभीर कोरोना रुग्णांना दिलासा मिळाला आहे. रेमडेसिवीरचा देशात तुटवडा निर्माण झाल्यानंतर त्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने घेतला होता. रेमडेसिवीरची उपलब्धता वाढविणे तसेच किमती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करीत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी शनिवारी दिली.
सरकारच्या मध्यस्थीनंतर रेमडेसिवीरच्या किमती कमी केल्या जात असल्याचे प्रमुख औषध कंपन्यांकडून सांगण्यात आले. किमती कमी झाल्यामुळे लाखो कोरोना रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे. रेमडेसिवीरच्या किमती दोन हजार रुपयांपर्यंत कमी झाल्या आहेत. औषध विभागाचे सल्लागार संचालक डॉ. विनोद कोतवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅडिला हेल्थकेअर कंपनीच्या रेडमॅक इंजेक्शनची किंमत 2800 रुपयांवरून 899 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. सायजेन इंटरनॅशनल लिमिटेडच्या रेमविन इंजेक्शनची किंमत 3950 रुपयांवरून 2450 रुपयांपर्यंत कमी झाले आहे. डॉ. रेड्डीज लॅबच्या रेडवायएक्स इंजेक्शनची किंमत 5400 रुपयांवरून 2700 रुपयांपर्यंत तर सिप्ला कंपनीच्या सिपरेमी इंजेक्शनची किंमत 4 हजार रुपयांवरून 3 हजार रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.