पुण्यात कोरोना चाचणीचे बनावट रिपोर्ट देणारे रॅकेट उद्ध्वस्त; दोघांना अटक ;अधिक तपास सुरू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.१८ एप्रिल । पुणे । जंगली महाराज रस्त्यावरील एका वैद्यकीय चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळेच्या नावाने आरोपींनी बनावट अहवाल दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रेमडेसिवीरच्या काळ्याबाजारानंतर बनावट रिपोर्ट देणाऱ्यांचे रॅकेट समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.सागर अशोक हांडे (वय २५, सध्या रा. ज्ञानेश्वर कॉलनी, संगम चौकाजवळ, मूळ रा. द्रावणकोळा, ता. मुखेड, जि. नांदेड) आणि दयानंद भीमराव खराटे (वय २१, सध्या रा. गणपती माथा, वारजे माळवाडी, मूळ रा. भोगजी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत जंगली महाराज रस्ता परिसरातील प्रयागेशाळेच्या व्यवस्थापकाने तक्रार दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जंगली महाराज रस्त्यावरील एका प्रयोगशाळेच्या नावाने कोरोना चाचणीचे बनावट अहवाल तयार करून हांडे आणि खराटे यांच्याकडून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलिधर करपे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब झरेकर यांच्या पथकाने दोघांना सापळा रचून अटक केली.आरोपी पूर्वी एका लॅबमध्ये कामाला होता. ज्या नागरिकांना तत्काळ रिपोर्ट हवे आहेत. त्यांच्याकडून पैसे घेऊन बनावट रिपोर्ट मोबाईलवर पाठवत होते. या दोघांनी लॅबमध्ये काम केले असल्यामुळे स्वॅब घेतल्याचे दाखवून खोटे रिपोर्ट देखील दिले असण्याची शक्यता आहे. तसेच, काही जणांना तत्काळ कामांसाठी निगेटिव्ह रिपोर्ट हवे होते. त्यांना तसे बनावट रिपोर्ट दोघांनी दिले आहेत. या प्रकरणी दोघांकडे अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक मुरलीधर करपे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *