महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । नवीदिल्ली । दि.१८ एप्रिल । गेल्या वर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका तुरीच्या वाढीला बसला. तूर, मूग, उडीद काढणीच्या वेळी भिजले. रब्बी हंगामातील हरभरा काढणीस उशीर झाला. त्यामुळे उत्पादन घटले. त्यामुळे किरकोळ बाजारात एक किलो तूरडाळीच्या दरात गेल्या काही महिन्यांत दहा ते पंधरा रुपयांनी वाढ झाली. मूग, उडीद, हरभरा, मसूर या डाळींच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. खाद्यतेलांच्या दरात सातत्याने वाढ होत असताना आता तूरडाळीचे दर कडाडले आहेत. किरकोळ बाजारात तूरडाळीने शंभरी पार केली असून, सर्वच डाळींच्या दरातील वाढीमुळे सामान्यांना मोठी झळ बसत आहे.
करोना संसर्गामुळे राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून किराणा माल खरेदीसाठी किरकोळ बाजारात गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. खाद्यतेलांच्या दरात सातत्याने वाढ होत असताना पाठोपाठ तूरडाळ दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांना मोठी झळ बसत आहे.
किरकोळ बाजारातील डाळींचे किलोचे दर
तूरडाळ- ११० ते ११५ रुपये
मूग- ११० ते ११५ रुपये
उडीद- १०० ते ११० रुपये
हरभरा- ७० ते ७५ रुपये
मसूर-७५ ते ८० रुपये