महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.१९ एप्रिल । मुंबई ।काेरोना रुग्णसंख्या वाढत असून, उपचारासाठी ऑक्सिजनची वाढती मागणी वाढत आहे. दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) आणि ऑक्सिजन सिलिंडरच्या वाहतुकीसाठी रेल्वे ऑक्सिजन एक्सप्रेस चालविणार आहे. काेराेनाग्रस्तांवरील उपचारासाठी आवश्यक ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज झाली आहे.
रस्तेमार्गे ऑक्सिजन वाहतुकीचा कालावधी वाढत असल्याने रेल्वेच्या माध्यमातून ही वाहतूक अधिक वेगवान हाेऊ शकते. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने ऑक्सिजनची वाहतूक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का, याची चाचपणी केली. त्यानुसार आता फ्लॅट वॅगन्सवर ऑक्सिजन टँकर ठेवून रोरो वाहतूक करण्यात येणार आहे.
या राे राेसाठी विशिष्ट उंचीचे टँकर राज्याच्या परिवहन विभागाकडून पुरविण्यात येणार आहेत. माेकळे टँकर कळंबाेळी आणि बाेईसर रेल्वे स्थानकातून वॅगन्सवर चढविण्यात येतील.ऑक्सिजन साठा टँकरमध्ये भरुन आणण्यासाठी विजाग, जमशेदपूर, राउरकेला, बोकारो येथे पाठविले जाणार आहे. कळंबोली रेल्वे स्थानकात यासाठी गेल्या दोन दिवसापासून ट्रॅक बनवण्यात आला आहे. त्याचबरोबर टँकर चढवण्यासाठी मातीचा भराव करत ट्रॅक उंचीचा रॅम्प तयार करण्यात आला आहे . १५ टन रिकामे असलेले टँकर कळंबोली येथून विशाखापट्टणमसाठी सोमवारी रवाना होणार आहेत.