महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पिंपरी। दि.२० एप्रिल । पिंपरी-चिंचवड शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा व कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा भासत आहे. यासाठी शासनस्तरावर व महापालिका स्तरावर पाठपुरावा केला जात आहे. हा प्रश्न तीन दिवसांत संपेल, अशी भूमिका महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी मांडली. महापालिका असली तरी शासनाचे आम्हाला आदेश असतात. शासनाच्या आदेशानंतर आम्ही काम करतो. लवकरच या अडचणींवर मात करू, असे देखील ते म्हणाले.
पिंपरी-चिंचवडमधील डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी, महापालिका अधिकारी यांची कोविड महामारीच्या काळात डॉक्टरांना सामाना कराव्या लागणाऱ्या समस्यांबाबत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकारी व हॉस्पीटल ओनर असोसिएशचे पदाधिकारी, डॉक्टर, हॉस्पीटल ओनर असोसिएशनचे सचिव डॉ. प्रमोद कुबडे, डॉ. गणेश भोईर उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त ढाकणे म्हणाले की, कोविड काळात येणार्या अडचणींमुळे व काळजीने आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. गॅस पुरविणार्यांनी अचानक अडचणींमुळे गॅस देणार नसल्याचे सांगितले. त्याबाबत शासकीय पातळीवर बैठका सुरु आहेत. संख्या वाढायला लागल्यानंतर काही कंपन्यांकडून लस बनविण्यास सुरूवात केली. हाफकिन कंपनीसोबत चर्चा करत आहे. महापालिकेकडे 2 हजार 500 रुग्ण असताना 1 हजार 500 रेमडिसीव्हरची इंजेक्शन येत आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागाची देखील कसरत होत आहे.
अधिकाऱ्यांनी डॉक्टरांना त्रास देवू नये : आमदार लांडगे
आमदार लांडगे म्हणाले की, सुमारे 15 हजार डॉक्टरांची शहरात नोंदणी केलेली आहे. त्यांना आम्ही विनंती केली की, सेंटर चालू करतो, तुम्ही ते हाताळावे. स्वतःच रुग्णालय सांभाळून डॉक्टरांनी ही कामे केली. मात्र महापालिका अधिकारी त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यांना महापालिका अधिकारी त्रास देत आहेत. लोकप्रतिनिधी देखील संपर्क करत आहेत. नागरिक लोकप्रतिनिधींवर दबाव टाकत आहेत. नागरिकांना त्रास होतोय, त्या बद्दल लोकप्रतिनिधी या
जिल्हाधिकारी, तहसीलदारांकडे पाठपुरावा…
शहरात रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजनचा तुटवडा आहे. मात्र, मदत केली नाही की नागरिक नाराज होत आहेत. कोविडचे काम करणारे महापालिका अधिकारी व डॉक्टर यांची बैठक घेऊन यावर योग्य मार्ग काढला पाहिजे. त्यासाठी शहरातील तीनही आमदारांकडे मागण्यांचे निवेदन द्या, आम्ही मार्ग काढु. इंजेक्शनबाबत जिल्हाधिकारी, तहसिलदार यांच्याकडे पाठपुरावा करत आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
आमच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढे आले पाहिजे. आम्ही खांद्याला खांदा लावून काम करतो. जीव धोक्यात घालतो. कारकुनी काम वाढवल्यामुळे वेळ वाया जातो. पेशंट तपासण्यासाठी वेळ लागत आहे. अनेकांनी सर्व रुग्णालय बंद करण्याची मनस्थिती केली होती. मात्र आमदार लांडगे यांनी समस्यांवर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे.
– डॉ. प्रमोद कुबडे, सचिव, हॉस्पिटल ओनर असोसिएशन.