महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । ओमप्रकाश भांगे । दि.२९ एप्रिल। मुंबई । खुल्या बाजारात कोरोना प्रतिबंधक लस वाटेल त्या किमतीला विकली जात असून यामुळे ग्राहकांची लूट होत आहे. हे प्रकार थांबवण्यासाठी कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसीची किंमत 150 रुपये निश्चित करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे या याचिकेवर उद्या गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
भाजप शासित राज्यांना केंद्र सरकार लसीचा सुरळीत पुरवठा करत आहे, पण बिगर भाजप शासित राज्यात लसींचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे जास्त पैसे मोजून लोकांना लस विकत घ्यावी लागत असल्याचा दावा करत अॅड. फैजान खान व विधी शाखेच्या तीन विद्यार्थ्यांनी अॅड. विवेक शुक्ला यांच्या मार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. कोरोना लस जीवनावश्यक वस्तू असून विक्रीसाठी ती कोणत्याही खासगी कंपनीच्या हाती पडता कामा नये, पुढच्या टप्प्यात 18 ते 45 वयोगटातील लोकांना लस दिली जाणार असून उत्पादनाच्या 50 टक्के लस केंद्र सरकार आपल्या ताब्यात घेणार आहे तर 50 टक्के लस खुल्या बाजारात विकली जाणार आहे. त्यामुळे होणारा काळाबाजार लक्षात घेता या लसीची किमत 150 रुपये इतकी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.