महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । संजीवकुमार गायकवाड । नांदेड । दि.३ मे । नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे वेळोवेळी प्रयत्नांची शर्त केली जात आहे. जिल्ह्याचा भव्य विस्तार व 38 लाखाच्या जवळपास असेलेली लोकसंख्या विचारात घेवून जिल्ह्यात 12 ग्रामीण रुग्णालय, 68 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 377 आरोग्य उपकेंद्रे उभारुन आपण आरोग्य सुविधेचे जाळे भक्कम केले आहे. या व्यतिरिक्त चार उपजिल्हा रुग्णालय, एक शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, एक आयुर्वेदिक महाविद्यालय, एक जिल्हा रुग्णालय, एक स्त्री रुग्णालय याची सक्षम यंत्रणा आपल्याकडे आहे. या सर्व आरोग्य सुविधेचा विचार करुन ही सेवा अधिक भक्कम होण्यासाठी आता जिल्ह्यात 52 रुग्णवाहिका उपलब्ध करुन देत असतांना स्वाभाविकच आनंद होत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
महाराष्ट्र दिनानिमित्त या रुग्णवाहिकेच्या लोकार्पणाचा छोटेखानी समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, विधान परिषदेचे सदस्य आमदार अमर राजूरकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, महापौर सौ. मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड -19 च्या रुग्णांसह जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांमध्ये रेफरल ट्रान्सफोर्ट कार्यालयामार्फत माता मृत्यू व बाल मृत्यू कमी करण्यासाठी गरोदर माता आणि आजारी बालकांना मोफत वाहन संदर्भ सेवा आता या ॲम्बुलन्स उपलब्धतेमुळे आणखी चांगल्या प्रकारे होणार आहे. याचबरोबर गरोदर मातांची मोफत तपासणीसाठी, लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, जिल्ह्यातील सर्व केंद्रापर्यंत अत्यंत कमी कालावधीत लसीकरणाचा साठा पोहचविणे, ग्रामीण भागातील, दुर्गम व पहाडी परिसरात तसेच जंगल परिसरात विविध सर्वेक्षण करण्यासाठी तात्काळ वैद्यकिय सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून शासकीय रुग्णवाहिका उपयोगात आणली जात आहे.
जिल्ह्यात यापुर्वी जी काही वाहने उपलब्ध होती ती अनेक वर्षांपासून उपयोगात असल्याने त्याची वारंवार दुरुस्ती करावी लागत होती. यामुळे सदर जुने वाहने निर्लेखन केल्यामुळे राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत या ॲम्बुलन्स नांदेड जिल्ह्यासाठी घेणे शक्य झाले.