रेमडेसिव्हिर बाबत पुणे जिल्हा प्रशासनाच्या सूचना

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।पुणे । दि. ११ मे । रेमडेसिव्हिरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खासगी रुग्णालयांमार्फतच रेमडेसिव्हिर देण्याचा निर्णय घेतला. परंतु खासगी रुग्णालयांनी त्याचा वापर कोणत्या रुग्णांसाठी करायचा, यावर जिल्हा प्रशासनाला नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. संबंधित रुग्णालयांकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु काही रुग्णालयांकडून रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात गैरप्रकार होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. तसेच, सध्या रेमडेसिव्हिरची मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत वाढत चालली आहे. खासगी रुग्णालयांमधील बेड्‌सच्या सुमारे ५० ते ६० टक्के हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येत होते. परंतु काही दिवसांपासून औषधी कंपन्यांकडून होणाऱ्या पुरवठ्यात घट होत आहे. या पार्श्वभूमीवरआता खासगी रुग्णालयांनी कोणत्या रुग्णांसाठी प्राधान्याने या इंजेक्शनचा वापर करावा, याबाबत जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

ही लक्षणे असतील तरच द्या रेमडेसिव्हिर…

रुग्णाला सलग तीन दिवसांपेक्षा अधिक दिवस ताप

ऑक्सिजनची पातळी ९२ पेक्षा कमी होणे

क्ष-किरण अहवालामध्ये न्यूमोनिया आढळणे

रक्तातील सायटोकाइन मार्कर्समध्ये तीनपट वाढ होणे

छातीचा एचआरसीटी स्कोर ९ पेक्षा जास्त

रुग्णांच्या नातेवाइकांना रेमडेसिव्हिर बाहेरून विकत आणण्यासाठी प्रिस्क्रिप्शन देण्यात येत आहे. हे इंजक्शन सध्या खुल्या बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होत आहे. कोणत्याही रुग्णालयांनी रेमडेसिव्हिरसाठी प्रिस्क्रिप्शन दिल्यास त्यांचा पुरवठा बंद करण्यात येइल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *