महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । तळेगाव । दि. ११ मे ।मावळ तालुक्यातील लसीकरण केंद्रांमध्ये उपलब्ध झालेले डोस हे तालुक्यातील स्थानिक नागरिकांनाच मिळावेत अशी मागणी आमदार सुनिल शेळके यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत असता मावळ तालुक्यात राज्य शासनाच्या माध्यमातून 18 ते 44 वयोगट असेल किंवा 45 च्या पुढील वयोगट असेल यासाठी येणारे लसीचे डोस हे मावळ तालुक्यात मुळातच अल्पप्रमाणात येत असल्याने अत्यंत तुटवडा जाणवत आहे. मावळ तालुक्यात साधारण 28 लसीकरण केंद्रे असून प्रत्येक केंद्रास आवश्यक लसीचे डोस उपलब्ध होत नसल्याने प्रत्यक्षात 14 लसीकरण केंद्र सुरू आहेत.
मावळ तालुक्यात कोविड संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने तालुक्याची लोकसंख्या पाहता प्रत्येक लसीकरण केंद्रावर साधारण दररोज 300 डोसची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हे एकमेव शस्त्र असून अनेक वयोवृद्ध नागरिकांना लसीचा दुसरा डोसही उपलब्ध झालेला नाही. अशातच तालुक्याबाहेरील व्यक्तींचे लस घेण्यासाठी येण्याचे प्रमाण जास्त असल्याने तालुक्यातील स्थानिक नागरिक लसीकरणापासून वंचित राहात आहेत. तरी मावळ तालुक्यात उपलब्ध होणाऱ्या लस केवळ तालुक्यातील स्थानिक नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात. यासंबंधी दिनांक 15 मे 2019 पर्यंत योग्य निर्णय घेण्यात यावा, अन्यथा ऑनलाईन रजिस्ट्रेशन असूनही तालुक्याबाहेर व्यक्तींचे लसीकरण बंद करण्यात येईल. याची नोंद घ्यावी. असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.