‘पेरीविंकल’ ; औषधी गुणांचे भांडार – सदाफुली

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १६ मे । सदाफुली फुलझाड भारतामध्ये सर्रास आढळणारे असले, तरी हे मूळचे दक्षिण आफ्रिकेतील मॅडगास्कर प्रांतातील आहे. उष्ण प्रदेशांमध्ये उगविणारे हे फुलझाड आहे. या फुलझाडाचे वैज्ञानिक नाव ‘catharanthus roseus’ असे असून हिंदीमध्ये या फुलाझाडाला ‘सदाबहार’, इंग्रजी भाषेमध्ये ‘पेरीविंकल’, तर मराठी भाषेमध्ये ‘सदाफुली’ या नावाने ओळखले जाते.

हे फुलझाड जास्तीत जास्त एक मीटर उंचीपर्यंत वाढू शकते. या फुलांचा रंग गुलाबी, बैंगणी किंवा पांढरा असतो. हे फुलझाड बियांपासून किंवा कटिंगद्वारेही लावता येऊ शकते. हे फुलझाड वर्षभर बहरणारे आहे. याच्या पानांची चव कडवट असल्याने वन्य पाणी हे झाड खात नाहीत. या झाडावर कीड दिसून येत नाही, तसेच साप, विंचू, इत्यादी या झाडाचा आसपास येत नाहीत. या झाडाची पाने गळून पडल्यानंतर विघटीत होऊन मातीतले हानिकारक घटक नष्ट करतात.

सदाफुलीच्या मुळ्यांवरील साल औषधी मानली गेली आहे. यामध्ये विविध प्रकारचे क्षार असून, ‘एजमेलिसीन’ आणि ‘सरपेंटीन’ हे दोन क्षार सर्पगंधा समूहाशी संबंधित आहेत. सदाफुलीच्या मुळ्या शरीरातील रक्त शर्करा कमी करण्यास सहायक आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये या फुलझाडाचा उपयोग मधुमेहावर पारंपारिक उपचारपद्धतीच्या अंतर्गत केला जात आला आहे. मधमाशी किंवा इतर किड्यांच्या डंखावर या झाडाच्या पानांचा रस गुणकारी असल्याचे म्हटले जाते.

महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव प्रमाणाबाहेर जास्त होत असल्यास या झाडाच्या मुळ्यांचा वापर औषध म्हणून केला जातो. या झाडाच्या मुळ्यांच्या सालीचा वापर उच्चरक्तदाब, अनिद्रा आणि नैराश्य, चिंतारोग (anxiety) यांसारख्या काही मानसिक विकारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. ही साल वेदनाशामकही आहे. या झाडाच्या पानांमध्ये जीवाणूनाशक तत्वे आहेत. त्यामुळे अनेक तऱ्हेच्या संक्रमणांवर उपचार म्हणून पानाच्या रसाचा वापर करण्यात येत असतो.

टीप ; कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टर किव्हा तज्ज्ञ चा सल्ला घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *