सल्ला नको साथ हवी… मराठा उद्योजक लॉबी… मिळूनी सारे मित्र मित्र… एकत्र तर सर्वत्र…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. १९ मे ।

सुनील आढाव । संपादक । 8830448394 ।

मित्रहो, सध्या आपण कोरोना सारख्या महामारीचा सामना जीवाच्या आकांताने करत आहोत. सध्याची परिस्थिती फार महाभयंकर आहे. आज आपला मराठा युवक अपुरे शिक्षण, अपुरे कौशल्य, आपुरे भांडवल क्षमता यांमुळे कायमच पिछेहाट होऊन आर्थिकदृष्ट्या मागासलेला समाज म्हणून ओळखला जातो. खरे तर मराठा म्हणजे जो हट्टाला पेटतो तोच मरहट्टा अर्थातच मराठा, अशी मराठ्यांची ऐतिहासिक ओळख आहे. काहीतरी नाविन्य करण्याची तीव्र क्षमताही याच आपल्या मराठ्यांची आहे. मात्र तरीही दशकोंदशके नोकरी आणि गुलामीतच आपला मराठा अडकून पडलेला आहे. त्यामुळेच आजच्या महामारीच्या संकटात सगळ्यात जास्त चिंताग्रस्त आणि व्यथांची वेधशाळा बनलेले मराठा युवक पहायला मिळत आहेत. तरीही काही अंशी मराठी युवक अलिकडच्या काळात स्वतःचा उद्योग-व्यवसाय करण्यात सक्रिय झालेले आहेत. ठाणे, पालघर या जिल्ह्यातील अनेक युवकांनी एकत्र येऊन मराठा उद्योजक लॉबी ही उद्योजकांची सक्रीय अशी सद्विचारी संघटना स्थापन केलेली आहे. हळूहळू ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर फोफावताना दिसत आहे. एकत्र तर सर्वत्र हे ब्रिद घेऊन महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा युवकाने स्टार्ट अप करत छोटा-मोठा उद्योजक व्हावे, हेच ध्येय मराठा उद्योजक लॉबी या संघटनेचे असावे. असो. तर या मराठा उद्योजक लॉबीतील आजच्या डिजीटल युगात मात्र ज्या कुणाच्या डोक्यात ही क्रांतीकारक संकल्पना जन्माला आली असेल त्या थोर मराठ्या पट्ट्याला माझा मानाचा सलाम… चला, काही का असेना परंतु, मराठी पाऊल पडतेय पुढे…

——————————————————————-

मित्रांनो, आपल्या राज्याची, किंबहुना आपल्या देशाची अवस्था कशी झालेली आहे ठाऊक आहे… खुणी, दरोडेखोर, स्मगलर हे आपल्याला खासदार, आमदार म्हणून चालतात. परंतु, मुन्सीपाल्टीत नोकरी करणारा शिपाईसुद्धा बारावी पास लागतो. परंतु, राज्याची धुरा सांभाळणाऱ्या राजकारण्यांना मात्र शिक्षणाची अट नाही. साक्षर-निरक्षर हा माझा वाद नाही. एकीकडे साक्षरतेच्या नावाखाली कोट्यवधीं रुपये खर्च करायचे तर दुसरीकडे निरक्षर उमेदाराला लोकशाहीच्या नावाखाली सुट द्यायची. या सगळ्याची चीड न येण्याइतके षंढ आहोत का आपण… राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा. पण राजकारण हा बदमाशांचा अड्डा कुणामुळे झाला याचा विचार कधीच आपण करत नाही. मित्रांनो, साधी कोथिंबीरीची जुडीदेखील पारखून घेणारे आपण राजकारणाच्या बाबतीत एवढे गाफील का… खरे तर उमेदवार निवडताना, त्याचे शिक्षण, त्याची निष्ठा, त्याची प्रामाणिकता, त्याची सामाजिक जाणीव हे सगळं तपासून बघायला हवे की नाही… तुमचं मत अमूल्य आहे. ते देताना नीट विचार करून द्या… आणि मग बघा तुम्हालाच तुमच्या शक्तीचा अंदाज येईल. हे सगळे बदल लगेच घडणार नाहीत. पण मला शंभर टक्के खात्री आहे. आपण आज पाऊल उचलले तर येत्या काही दिवसातच आपल्या राज्याचा आरोग्य मंंत्री एक डॉक्टर असेल, अर्थमंत्री एक अर्थशास्त्र तज्ज्ञ असेल. क्रीडा मंत्री एक खेळाडू असेल.

कुणी एक मराठा आपल्या मराठीपणालाच दोष देत आलम मराठी रयतेच्या नावानेच हंबरडा फोडत असेल. आपण या सभोवतालच्या परिस्थितीला दोष देत बसणे हे कितपत योग्य आहे… कडे-कपाऱ्या, दऱ्या-खोऱ्यातून निधड्या छातीने घोड्याच्या टाफा ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यत नेल्या, त्या छत्रपती शिवरायांचे आपण अनुयायी म्हणवून घेताना मनात जराही खेद का वाटू नये… पहा आज गुजराती, सिंधी, उडपे, पंजांबी, उत्तर भारतीयांच्या वळचणीला पिढ्यानपिढ्या आपले मराठी युवक नोकरी करताना पहायला मिळताहेत. ही परिस्थिती आपल्यावर का आली…याचाही सर्वार्थाने विचार होणे अत्यंत गरजेचे आहे.

होय, आज उत्तर भारतीय मोठ्या हुुद्द्यावर त्यांच्या शिक्षणामुळे आहेत. सिंधी बांधव त्यांच्यातील असलेल्या रगीमुळे आज भारतीय सैन्यात फौजी आहेत. उडपी हॉटेल व्यवसाय करत आहेत. अन्नपूर्णा फक्त त्यांच्यावर प्रसन्न आहे का… बाकीच्या समाजावर नाही का… गुजराथी उद्योग व्यवसाय करतात. मग हे सर्व सुरू करण्यापासून कोणत्या भैय्याने, सिंध्याने, उडप्याने किंवा, गुजराथ्याने आपल्याला अडवले आहे. आपल्या मराठ्यांमध्ये असलेली उदासिनताच या सर्व बाबींना कारणीभूत आहे. मराठी पिपल कांट कॅरी वेस्टर्न कल्चर्स… मराठी माणूस पाश्चिमात्य संस्कृती आत्मसात करू शकत नाही. हे फक्त बोलण्यापुरतेच आहे. पण खरेच मराठ्यांनी जर ठरवले तर निश्चितच क्रांती घडू शकते. यासाठी फक्त मराठ्यांनी एकत्र यायला हवे. आपल्या मराठी भाषेत एक गाणे आहे, वेडात मराठे वीर, दौडले सात… फक्त सातच… बाकीचे मराठे कुठे आहेत… या गाण्यात आज खऱ्या अर्थाने बदल करण्याची गरज आहे. अर्थातच काय तर वेडात मराठे वीर दौडले सात नव्हे तर एकसाथ… कदाचित याचसाठी मराठा उद्योजक लॉबी सरसावली आहे. असे मला वाटतेय… कारण ते म्हणताहेत… एकत्र तर सर्वत्र… म्हणूनच म्हणतोय मिळूनी सारे मित्र… एकत्र तर सर्वत्र… एकमेकांना सल्ला देण्यापेक्षा साथ द्या… मित्रांनो, या मराठा उद्योजक लॉबीच्या उद्देशाचा एक घटक बनूया… आणि उद्योजक जगतातील ध्रुवतारा अर्थात आकाशातील सर्वात जास्त चमकणारा तारा म्हणून मराठा उद्योजक नावारुपास यावा, हीच अभिलाषा… आणि उद्याच्या अभ्युदयाची एकमेव आशा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *