महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. १९ मे । कोरोनाबाधित रुग्णांकडून अवाजवी बिले घेऊन त्यांची लूट करणाऱया पंढरपुरातील खासगी रुग्णालयांना लेखापरीक्षण विभागाने लगाम लावला आहे. शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक पैसे आकारणाऱया शहरातील 15 खासगी रुग्णालयांमधील 540 बिलांची तपासणी करून तब्बल सात लाख तीन हजार 700 रुपये कमी केल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.
पंढरपूर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत.
यासाठी प्रशासनाकडून पंढरपूर तालुक्यात 19 डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला मान्यता देण्यात आली आहे.राज्य शासनाने कोरोनाच्या उपचारासाठी चाचणी, तसेच रुग्णालयातील उपचाराबाबत रक्कम निश्चित केली असतानाही खासगी रुग्णालयांनी जादा बिलाची आकारणी केल्याच्या तक्रारी येत आहेत.खासगी रुग्णालयांनी कोरोनाबाधित, तसेच इतर रुग्णांच्या उपचारासाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार आकारणी करावी, असे आवाहन प्रांताधिकारी ढोले यांनी केले आहे.