महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. १९ मे ।कोरोना संसर्गाचा फटका जागतिक क्रिकेटलाही बसला. लॉकडाऊनमुळे बहुतांशी दौरे रद्द करावे लागले. काही मालिका पुढे ढकलण्यात आल्या. हिंदुस्थानी क्रिकेटवरही याचे पडसाद उमटले. यूएईतील आयपीएल, ऑस्ट्रेलियन दौरा व मायदेशातील इंग्लंडविरुद्धची मालिका वगळता टीम इंडियाला इतर मालिका खेळता आल्या नाहीत; पण यापुढील दोन वर्षांमध्ये हिंदुस्थानी क्रिकेट संघ नॉनस्टॉप क्रिकेट खेळणार आहे. 2021 ते 2023 या दोन वर्षांमध्ये दोन टी-20 वर्ल्ड कप व एक वन डे वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच 2022 सालामध्ये हिंदुस्थानचा बांगलादेश दौराही निश्चित करण्यात आला आहे. एकूणच काय, तर तमाम क्रिकेटप्रेमींना अक्वल दर्जाच्या क्रिकेटची मेजवानी लाभणार आहे.
हिंदुस्थानचा संघ 2022 सालामध्ये प्रचंड क्रिकेट खेळणार आहे. पुढल्या वर्षी टीम इंडियाचे वेळापत्रक व्यस्त असणार आहे. जानेवारी-फेब्रुवारीदरम्यान वेस्ट इंडीजचा संघ हिंदुस्थानात तीन वन डे व तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळायला येणार आहे. त्यानंतर श्रीलंकन संघ हिंदुस्थानात तीन कसोटी व तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळेल. एप्रिल-मे महिन्यात आयपीएल आटोपल्यानंतर हिंदुस्थानचा संघ इंग्लंड दौऱयावर तीन वन डे व तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळायला रवाना होईल. जुलै-ऑगस्ट महिन्यात हिंदुस्थानी संघ वेस्ट इंडीजमध्ये तीन वन डे व तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळेल. सप्टेंबर महिन्यात आशिया कपचे आयोजन करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया-हिंदुस्थान सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत चार कसोटी, तीन वन डे व तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत एकमेकांना टक्कर देतील. नोव्हेंबर महिन्यात हिंदुस्थानचा संघ बांगलादेश दौऱयावर दोन कसोटी व तीन वन डे सामने खेळण्यासाठी जाईल.
हिंदुस्थानात या वर्षी टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. ही प्रतिष्ठेची स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे. त्यानंतर 2022 सालामध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीनुसार या स्पर्धांमध्ये अदलाबदलीही होऊ शकते किंवा इतरत्र या स्पर्धाही हलवण्यात येऊ शकतात; पण सध्या तरी या दोन स्पर्धा आयोजनामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 2023 सालामध्ये वन डे वर्ल्ड कपचा धमाका पुन्हा एकदा हिंदुस्थानात होणार आहे. सलग तीन वर्षांमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱया स्पर्धा होणार आहेत.