महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. १९ मे । कोरोनाच्या संकट काळात आता राज्यापुढे निर्माण झाले आहे. या आजाराचे सर्वाधिक 318 रुग्ण पुणे जिल्ह्यात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. आतापर्यंत पुण्यात म्युकरमायकोसिसमुळे 20 जणांचा मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसिसचा वाढता धोका लक्षात घेता रुग्णालयांसाठी नवी नियमावली जाहीर केल्याचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले. पालकमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सूचना केल्यानंतर मायकोसिसच्या रुग्णांवर उपचारासाठी ससून रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, राज्यात म्युकरमायकोसिस या आजाराची तीव्रता वाढत असून त्यासाठी बहुआयामी विशेषज्ञ सेवांची गरज भासत आहे. या आजाराचा खर्च जास्त असून सामान्य रुग्णांवर त्याचा भार पडू नये यासाठी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र नागरिकांवर राज्यातील अंगीकृत 1 हजार रुग्णालयांमध्ये म्युकर मायकोसिस आजारावर उपचार करण्यात येतील. यासंदर्भात मंगळवारी शासन निर्णय जाहीर करण्यात आला असून, ही योजना 30 सप्टेंबर 2021 पर्यंत अमलात राहील.
या आजारावरील उपचारामध्ये अँटीफंगल औषधे हा महत्त्वाचा भाग असून ती कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत. त्याबरोबरच ती महाग देखील आहेत. ही औषधे शासनाच्या प्रचलित नियमानुसार विहित कार्यपद्धती अनुसरून संबंधित प्राधिकरणाकडून उपलब्ध करून घेण्यात यावीत व अंगीकृत रुग्णालयास पात्र लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात यावीत, असे शासन निर्णयात म्हटले आहे.