![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ४ फेब्रुवारी २०२६ | सरकारी नोकरीतला माणूस पगारावर जगतो, पण मन PF वर ठेवतो! महिन्याच्या शेवटी हातात येणाऱ्या रकमेपेक्षा “आपल्या PF खात्यात किती जमा झालं?” हा प्रश्न अधिक महत्त्वाचा. कारण तेच पैसे निवृत्तीच्या वेळी आधार, आणि अडचणीच्या काळात श्वास बनतात. पण आता हाच आधार थोडासा हलणार असल्याची चिन्हं आहेत. EPFO कडून PF वरील व्याजदर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, आणि त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आतापर्यंत ८.२५ टक्क्यांचा गोड व्याजदर मिळत होता; आता तो ८ ते ८.२० टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो, अशी कुजबुज सुरू झाली आहे. आकडा छोटा वाटतो, पण सरकारी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन बचतीत हा फरक टोचणारा ठरू शकतो.
खरा सस्पेन्स पुढच्या महिन्यात उघड होणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची २३९ वी बैठक होणार असून, तिथंच २०२५-२६ साठीचा व्याजदर ठरणार आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांत EPFO ने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे “यावेळीही तसेच राहील” अशी आशा होती. पण परिस्थिती बदलली आहे. EPFO मध्ये सदस्यसंख्या झपाट्याने वाढते आहे. अधिक लोक, अधिक पेमेंट्स आणि वाढती जबाबदारी— या सगळ्याचा तोल सांभाळण्यासाठी व्याजदर थोडा कमी करण्याचा विचार केला जात असल्याचं बोललं जातंय. अर्थात, हा निर्णय थेट EPFO चा नसून, अर्थ मंत्रालयाची मंजुरी मिळाल्याशिवाय शिक्का बसणार नाही. पण फाईल्स हलू लागल्याचं मात्र स्पष्ट आहे.
या बैठकीत फक्त व्याजदराचाच नाही, तर वेतन मर्यादेचाही मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता आहे. सध्या PF साठीची वेतन मर्यादा १५ हजार रुपये आहे; ती २५ हजारांपर्यंत वाढवण्याचा विचार सुरू आहे. एकीकडे व्याजदर कमी, तर दुसरीकडे कव्हरेज वाढ— असा हा आर्थिक ताळमेळ आहे. काहींना यात दिलासा दिसतो, तर काहींना भीती. कारण व्याजदर कमी झाला, तर दीर्घकाळात मिळणारी रक्कम घटणार; पण वेतन मर्यादा वाढली, तर जास्त लोकांना सामाजिक सुरक्षेचं छत्र मिळणार. थोडक्यात काय— EPFO चा तराजू सध्या काट्यावर उभा आहे. कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा एका बाजूला, तर आर्थिक शिस्त दुसऱ्या बाजूला. आता पाहायचं एवढंच, की पुढच्या महिन्यात EPFO कर्मचाऱ्यांच्या खिशात दिलासा टाकणार की थोडा हात आवळणार!
