Pune Weather : स्वेटर की एसी? पुणेकर गोंधळात! एकाच दिवशी तीन ऋतूंचा अनुभव

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ५ फेब्रुवारी २०२६ | सकाळी घराबाहेर पडताना स्वेटर घालावा की नाही आणि दुपारी ऑफिसमध्ये एसी लावावा की फॅन—या गोंधळात सध्या पुणेकर सापडले आहेत. डिसेंबरमध्ये गुलाबी थंडीने हुडहुडी भरवणाऱ्या पुण्यात, जानेवारीपासून अचानक तापमानात झालेल्या बदलामुळे एकाच दिवशी तीनही ऋतूंचा अनुभव येत आहे.

डिसेंबर महिन्यात पुण्याचे किमान तापमान ८ ते १० अंशांपर्यंत घसरले होते. मात्र, जानेवारी उजाडताच किमान आणि कमाल तापमानात मोठी वाढ झाली. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाही थंडीचा फारसा प्रभाव दिसून येत नसून, पुढील पाच ते सात दिवस हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

कधी ढगाळ वातावरण, तर कधी तीव्र ऊन—यामुळे हवेतला गारवा हरवला आहे. या लहरी हवामानामागे उत्तर भारतातील पश्चिमी विक्षोभ आणि बंगालच्या उपसागरातून वाहणारे बाष्पयुक्त वारे कारणीभूत असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.

हवामान का बदलतंय?
हवामान विभागाचे वैज्ञानिक डॉ. एस. डी. सानप यांनी सांगितले की,
“डिसेंबरमध्ये उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या व थंड वाऱ्यांचा महाराष्ट्रावर मोठा प्रभाव होता. मात्र जानेवारीत उत्तर भारतात सक्रिय झालेल्या पश्चिमी विक्षोभामुळे थंड वाऱ्यांचा प्रवाह महाराष्ट्राकडे कमी झाला. त्याचवेळी बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे आर्द्रता वाढली आणि ढगाळ स्थिती निर्माण झाली.”

आरोग्यावरही परिणाम
या तापमानातील चढ-उतारामुळे सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे यांसारख्या तक्रारी वाढत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *