महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ मे । वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) पुढच्या महिन्यात होणार आहे. 1 या सामन्याआधी न्यूझीलंडचे बॉलिंग कोच शेन जुर्गेंसन यांनी टीम इंडियाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. टीम इंडियाचा कोणता खेळाडू न्यूझीलंडसाठी डोकेदुखी ठरेल? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) किंवा चेतेश्वर पुजाराचं (Cheteshwar Pujara) नाव घेतलं नाही. ऋषभ पंत (Rishabh Pant) आमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो, अशी भीती जुर्गेंसन यांनी व्यक्त केली.
टेलिग्राफशी बोलताना जुर्गेंसन म्हणाले, ‘ऋषभ पंत धोकादायक खेळाडू आहे, जो एकट्याच्या जीवावर मॅचचा निकाल बदलू शकतो. त्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली. तो सकारात्मक विचार असलेला खेळाडू आहे. त्याची विकेट घेणं खूप गरजेचं आहे, यासाठी तो संधीही देतो. आमच्या बॉलरनी चांगली बॉलिंग करून पंतला रन बनवण्यापासून रोखण्याची गरज आहे. जेव्हा तो फॉर्ममध्ये असतो तेव्हा त्याला रोखणं कठीण असतं, यावर आम्हाला लक्ष दिलं पाहिजे.’
न्यूझीलंडकडे ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) आणि टीम साऊदी (Tim Southee) यांच्यासारखे अनुभवी बॉलर असतानाही जुर्गेंसन यांनी काईल जेमिसनचं (Kyle Jamieson) कौतुक केलं. आयपीएलच्या या मोसमात जेमिसन रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून (RCB) खेळला. ‘आयपीएलमध्ये विराट आणि जेमिसनने नक्कीच चर्चा केली असेल, जी फायनलमध्ये बघायला मिळेल. जेमिसनला बघायला मजा येईल, त्याचं टेस्ट करियर आतापर्यंत शानदार राहिलं. फायनलआधी इंग्लंडविरुद्धच्या दोन टेस्टमध्ये आम्हाला तयारीची चांगली संधी आहे,’ अशी प्रतिक्रिया जुर्गेंसन यांनी दिली.
‘भारताकडे आव्हानात्मक बॉलिंग आक्रमण आहे. त्यांच्याकडे खूप पर्याय आहेत. आम्ही जसप्रीत बुमराहपासून (Jasprit Bumrah) ते शार्दुल ठाकूरपर्यंतचा (Shardul Thakur) सामना करू शकतो. शार्दुल चांगला ऑलराऊंडर आहे, ऑस्ट्रेलियातही त्याने चांगली कामगिरी केली होती. मोहम्मद सिराजही (Mohammad Siraj) फॉर्ममध्ये आहे. एवढच नाही तर त्यांचे स्पिनरही लयीमध्ये आहेत,’ असं वक्तव्य जुर्गेंसन यांनी केलं.