महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २७ मे ।एसटी महामंडळात मागील 4 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांच्या पगारातून एलआयसीचे हफ्ते कट होत आहे. परंतु ते एलआयसीकडे जमा झालेच नाहीत. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना पॉलिसी लॅप्स होत असल्याचे मेसेज येत आहेत. कामगार संघटनांच्या माहितीनुसार तब्बल 2 कोटी रुपये महामंडळाने जमा केले नाहीत. त्यामुळे या काळात एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याची भरपाई एसटी महामंडळ कुठून करणार असा सवाल संघटनांनी उपस्थित केला आहे.
पॉलिसीचे हफ्ते एसटी महामंडळाने एलआयसीकडे भरणं बंद झाल्यापासून म्हणजे मागील 4 महिन्यांत एसटी महामंडळात कोरोनामुळे मृत्यूमूखी पडलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 100 ते 150च्या आसपास आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना कुठून भरपाई मिळणार ? असा सवाल संघटनांनी उपस्थित केला आहे. एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या पगारातून कट होत असलेल्या एसआयसी हप्त्यांची थकीत रक्कम वेळेत एलआयसीकडे जमा करावी, अन्यथा आम्हाला नाईलाजास्तव न्यायालयात जावं लागेल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला आहे.
दरम्यान, एसटी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांची तब्बल 40 कोटींची वैद्यकीय बिलं देखील थकवल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. त्यामुळे आधीच तुटपुंज्या पगारात कसंबसं घर चालवणारा एसटी कामगार वर्ग पुरता मेटाकुटीला आला आहे. या कोरोनाच्या महामारीत शेकडो एसटी कर्मचारी कोरोना बाधीत झाले होते. त्यांनी खासगी रूग्णालयात उपचार घेऊन स्वत:चा जीव कसाबसा वाचवला खरा पण दवाखान्याची बिलं करण्यासाठी अनेकांना उसनवारी करावी लागलेली आहे. कारण एसटी मंहामंडळाकडे कॅशलेस आरोग्य विमा पॉलिसीच उपलब्ध नाहीय.
या थकीत वैद्यकीय बिलांबाबत एसटी महामंडळाकडे विचारणा केली असता महामंडळाच्या आर्थिक डबघाईचं कारण सांगितलं जातं. त्यामुळे आम्ही आता ही कोरोना काळातील लाखोंची वैद्यकीय बिल फेडायची तरी कशी? असा प्रश्न एसटी कर्मचारी विचारत आहेत. दरम्यान, एकिकडे एसटी महामंडळ पैशांअभावी कर्मचाऱ्यांची देणी थकवत असलं तरी दुसरीकडे हेच महामंडळ खासगी कंञाटदारांकडून 500 गाड्या भाड्याने घ्यायला निघालंय, विशेष म्हणजे खासगी कंत्राटदारांच्या या गाड्या फक्त नफ्यातील रूटवर चालवल्या जाणार आहेत म्हणे, याचाच अर्थ एस महामंडळ आणखी आर्थिक डबघाईला जाणार, अशी भीती कर्मचारी संघटनांना वाटतेय. म्हणूनच लालपरी भाड्याने घ्यायला एसटी कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे कोरोना लॉकडाऊन पूर्णपणे उठल्यावर या मुद्यावरून एसटी महामंडळ आणि कर्मचारी संघटना यांच्यात नवा संघर्ष उभा ठाकण्याची चिन्हं दिसताहेत.