महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २९ मे । यास चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालला पोहोचले; मात्र आढावा बैठकीसाठी नंदीग्राममध्ये ममतांना पराभूत करणारे शुभेंदू अधिकारी यांना आमंत्रित केल्याने येथे मानापमान नाट्य रंगले.सुरुवातीला तर ममतांनी या बैठकीला जाण्यासच नकार दिला. त्यानंतर या बैठकीसाठी ममतांनी मोदींना चक्क अर्धा तास वाट पाहायला लावली. पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील कलाईकुंडा येथे झालेल्या बैठकीला राज्यपाल जगदीप धनकड उपस्थित होते; मात्र ममता बॅनर्जींची खुर्ची जवळपास 30 मिनिटे रिकामीच होती.
पंतप्रधान मोदींनी दोन्ही राज्यांच्या विरोधी पक्षनेत्यांना बोलावले होते. ओडिशाचे विरोधी पक्षनेते कोरोनातून बरे झालेले नसल्याने ते उपस्थित राहिले नाहीत; पण बंगालमधील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी मात्र उपस्थित राहिले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनाही बैठकीसाठी संपर्क केला होता; मात्र ते दिल्लीत असल्याने बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत.
मोदी-ममता 15 मिनिटांची भेट विधानसभा निवडणुकीत मोदींना ममतांनी मात दिली. निवडणूक निकालानंतर प्रथमच हे दोन नेते समोरासमोर आले. दोघांमध्ये पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील कलाईकुंडा येथे 15 मिनिटे चर्चा झाली. ममतांनी मोदींना राज्यातील वादगळग्रस्त भागाची माहिती दिली. दरम्यान, ममता शनिवारी वादळग्रस्त भागाची हवाई पाहणी करणार आहेत. ममता म्हणाल्या की, पंतप्रधानांनी बैठक बोलावली होती. मला माहिती नव्हते की, दीघा येथे त्यांची भेट होईल. कलाईकुंडा येथे मी पंतप्रधानांना वादळाने केलेल्या नुकसानीचा अहवाल दिला. दीघा आणि सुंदरबनच्या विकासासाठी 10 आणि 20 हजार कोटींची मागणी केली. राज्यातील अधिकार्यांना माझी भेट घ्यायची असल्याने मोदींची परवानगी घेऊन मी तिथून निघाले.