महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० मे । अगोदरच कोरोनामुळे त्रस्त सर्वसामान्य, मध्यमवर्गीय नागरिक महागाईच्या भडक्यामुळे आणखी संकटात सापडले आहेत. संकटाच्या उस्मानाबादेत पेट्रोल १०१ तर डिझेल ९१.३१ रुपयांवर पोहोचले आहे. कोरोनाने अनेक कुटुंबातील कर्ती मंडळी गेल्याने संकटात सापडलेल्या कुटुंबांचा जगण्याचा संघर्ष यामुळे आणखीच तीव्र झाला असून, जगणं महाग तर मरणं सोपं झाल्यासारखे वाटत आहे. पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर तेजीने वाढणारे पेट्रोल व डिझेलचे दर खाली उतरण्यास तयारच नाहीत. या महिन्यातील ४ मेपासून सुरू झालेली दरवाढीची घोडदौड थांबण्याचे नाव घेत नाही. सलग १५ व्या वेळी या महिन्यात पेट्रोल व डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत.
खाद्यतेल, जीवनावश्यक वस्तूही भडकल्या
पेट्रोल व डिझेलचे दर गेल्या दोन महिन्यांपासून वेगाने वाढत आहेत. वाहतूक व इतर कारणांमुळे त्याच वेगाने महागाईही वाढत आहे. खाद्यतेल १०० रुपयांवरून थेट १५० रुपये किलोवर गेले आहे. तसेच विविध दाळी, शेंगदाने, अन्य किराणा व मसाल्याच्या पदार्थांचे दरही २० ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे एकीकडे लॉकडाऊनमुळे अावक कमी आणि खर्च अधिक झाल्याने याचा ताळमेळ घालताना नाकीनऊ येत आहेत. आणखी कोरोनाची परिस्थिती काही दिवस काय राहिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.
सत्ताधाऱ्यांवर झापड, विरोधक हरवले
वाढत्या महागाईवर सत्ताधारी बोलण्यास तयार नाहीत. कोणी बोलले तर मागील सरकारच्या काळातील महागाईच्या वाढत्या आलेखांचा दाखला दिला जातो. तेव्हा तर याच्यापेक्षा महागाईचा दर होता. यामुळे सध्याच्या विरोधकांमध्येही धार उरलेली नाही. केवळ प्रसिद्धी व दिखावा म्हणून केवळ काही वेळ आंदोलनं होते. नंतर काही वेळातच सध्याचे विरोधक निघून जात असल्याचे दिसून येते. सत्ताधारी तर डोळ्यांवर झापड ठेवून वावरत असल्याचे चित्र आहे.
किराणा मालाची खरेदी किंमत व वाहतुकीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. यामुळे सध्या किरकोळ विक्रीही वाढली आहे. खाद्यतेलाचा दर तर इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच पाहण्याची वेळ आली आहे. डिझेलच्या दराच्या वाढीचा परिणाम अन्य मालावरही होत असल्याचे आजवर दिसून आले आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षी तब्बल सहा महिने कडकडीत लॉकडाऊन होता. यावर्षी दीड महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद आहेत. यामुळे अनेकांचे उत्पन्न घटले आहे. चहा वाल्यांपासून लहान, मोठ्या वस्तू विकणाऱ्यांचे उत्पन्न घटले आहे. तसेच हमाल, कामगारांचा रोजगार बुडाला आहे. अशा परिस्थितीत महागाई वाढली आहे. यामुळे आता जगावे कसे, असा प्रश्न अनेकांसमोर पडला आहे. कमी वेतनात खासगी नोकरी करणाऱ्यांचीही अवस्था अशीच झाली आहे. मध्यमवर्गीय तर कोलमडून पडले आहेत.