महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. ३० मे । कोरोना महारोगराईमुळे ज्या मुलांच्या पालकांचा अथवा पालकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे, अशा मुलांची नोंदणी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या (एनसीपीसीआर) बाल स्वराज या (कोरोना केअर लिंक) ट्रॅकिंक पोर्टलवर करण्याचे निर्देश केंद्राकडून राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. मदत आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना या पोर्टलद्वारे मदत मिळेल,असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त केला जात आहे. या मुलांची माहिती पोर्टलवर त्वरित अपलोड करण्याचे आदेश संबंधित अधिकारी, विभागांना देण्यात आले आहे.
ज्या मुलांनी आपले कुटुंब गमावले आहे, ज्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नाही, अशा मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज असते. त्यांची निगा राखण्यासाठी आणि त्यांच्या हिताच्या दृष्टीने या कायद्यातील सर्व प्रक्रियांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असते, असे मत केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या २८ मे रोजीच्या आदेशान्वे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील जिल्हा अधिकाऱ्यांना आयोगाच्या या पोर्टलवर कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांविषयीची माहिती अद्ययावत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आयोगाने सर्वोच्च न्यायालायाच्या या आदेशाची माहिती सर्व राज्यांच्या महिला आणि बाल विकास विभाग, समाज कल्याण विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आली आहे. कोरोनाचा फटका बसलेल्या मुलांचा शोध घेवून त्यांना बालकल्याण समिती समोर नेले आहे किंवा नाही हे जाणून घेण आणि त्यांचे पालक, इतर पालक, नातेवाईक त्यांच्या मदतीने त्यांचे पुनर्वसन करणे, त्यांनंतरही त्यांच्याविषयीची माहिती घेत राहणे या बाल स्वराज कोरोना केअर पोर्टलचा उद्देश आहे. पोर्टलवर जिल्हा आणि राज्य स्तरावरील अधिकाऱ्यांनी भरलेल्या माहितीवरुन आयोगाला, त्या मुलाची पार्श्वभूमी आणि वारसा हक्काने त्याला मिळू शकणारी आर्थिक किंवा इतर संपत्ती याची माहिती मिळू शकते.