महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. ३१ मे । कोरोनाच्या विषाणूचा प्रसार हा चीनमधील प्रयोगशाळेतूनच झाल्याचे आता पुन्हा एकदा समोर आले आहे. ब्रिटीश संशोधकांनी यासंदर्भातील दावा केला असून आता पुन्हा एकदा चीनच्या कुरापती जगासमोर आणल्या आहेत. या दाव्यानुसार कोरोनाचा विषाणू हा वुहान येथील प्रयोगशाळेतूनच बाहेर आला आहे. तर नैसर्गिकरीत्या हा विषाणू बाहेर आल्याचा चीनने केलेला दावा देखील या ब्रिटीश संशोधकांनी खोडून काढला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या विषाणूची निर्मिती कशी झाली याचा शोध घेण्यासाठी काही देशांनी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. अमेरिकेने तर यासाठी गुप्तचर यंत्रणेला 90 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असतानाच ब्रिटीश संशोधकांनी यासंदर्भातील दावा केल्याने चीनच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे. ब्रिटीश संशोधक डॉ. एंगस डेल्गलिश आणि नॉर्वे येथील डॉक्टर बॅर्गर सोरेनसेन यांनी हा दावा केला आहे.
ब्रिटीश संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार कोरोनाचा विषाणू हा नैसर्गिक असल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही.कोरोना विषाणू नैसर्गिकरीत्या आणि वटवाघळांच्या माध्यमातून जगासमोर आल्याचे दाखविण्याचे प्रयत्न चीनच्या संशोधकांकडून करण्यात आल्याचे यावेळी समोर आले आहे.
ब्रिटीश संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार चीनच्या संशोधकांनी प्रयोगशाळेतील अनेक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. चीनच्या शास्त्रज्ञांकडून याअगोदर- देखील अशा प्रकारचे अनेक प्रयत्न करण्यात आले होते. मात्र तज्ञांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे यावेळी नमूद करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे, हा विषाणू प्रयोगशाळेतून लोकांपर्यंत पोहोचेपर्यंत त्याने आक्रमक स्वरूप धारण केल्याचेदेखील यावेळी अभ्यासातून उघड झाले आहे.