महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जून । आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मुख्य मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचासमावेश असणाऱ्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत चर्चा झाली, असली तरी लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानी तासाभराहून अधिक काळ चाललेल्या या बैठकीत इतर अनेक महत्वाच्या विषयांसंदर्भात केंद्राकडे मागण्या करण्यात आल्या.
यापैकी प्रमुख मागण्यांमध्ये केंद्राकडे असणारा जीएसटी तसेच १४ व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबद्दलच्या मागण्यांचा समावेश आहे. राज्य सरकारने जीएसटी परतावा म्हणून २४,३०६ हजार कोटी आणि शहरी स्थानिक विकास निधी म्हणून परफॉर्मंन्स ग्रॅण्ट स्वरूपात मिळणारे हे १४४४.८४ कोटी रुपयांचे अनुदान आणि पंचायत राज संस्थांसाठी १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत मंजूर करण्यात आलेला १२०८.७२ कोटींचा निधी तातडीने मिळवून देण्यासंदर्भातील मागणी केली आहे. शिष्टमंडळाने मागण्यांद्वारे एकूण २६ हजार ९५९ कोटी ५६ लाख रुपयांचा महाराष्ट्राचा निधी केंद्राकडून येणे बाकी असल्याचे सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्यास सन २०२०-२१ साठी जीएसटी कराची भरपाई देताना, ती सुमारे रुपये ४६ हजार कोटी रुपयांची होती. आतापर्यंत राज्याला फक्त २२ हजार कोटी रुपये प्राप्त झाल्याचा उल्लेख शिष्टमंडळाने केलेल्या मागण्यांमध्ये आहे. महाराष्ट्राला केंद्राकडून २४ हजार ३०६ कोटी रुपये जीएसटी भरपाईपोटी मिळणे बाकी आहे. लवकरात लवकर ते मिळाल्यास कोरोनाच्या या अभूतपूर्व संकटात राज्याला आर्थिक दिलासा मिळेल, असे शिष्टमंडळाने म्हटले आहे.