महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जून । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील मॅच रेफरी आणि पंचांची नावे जाहीर केली आहेत. या सामन्यासाठी ख्रिस ब्रॉड मॅच रेफरी असतील. तर आयसीसी एलिट पॅनेलमधील रिचर्ड इलिंगवर्थ आणि मायकेल गफ मैदानावरील पंच असतील. रिचर्ड केटलबरो हे टीव्ही पंच असतील, तर अॅलेक्स व्हार्फ हे चौथे पंच असतील. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ ते २२ जून दरम्यान साऊथम्प्टन येथे अंतिम सामना होणार आहे.
आयसीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक (पंच व रेफरी) अॅड्रियन ग्रिफिथ म्हणाले, “वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी पंच आणि इतर सदस्यांची अनुभवी टीम जाहीर करण्यात आम्हाला आनंद झाला. या महामारीत हे सोपे काम नव्हते. अनेक वर्षांपासून ही मंडळी सातत्याने उत्कृष्ट काम करीत आहेत. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो.”