महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जून । सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानित वसतीगृह कर्मचाऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलाय. स्वयंसेवी संस्थांद्वारे चालवण्यात येणाऱ्या अनुदानित वसतीगृहांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनाच्या प्रश्नासंदर्भात आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 1 जुलै 2021 पासून वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. (Increase in honorarium of NGO subsidized hostel staff)
राज्याच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे चालवण्यात येणाऱ्या अनुदानित वसतीगृहांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनाच्या प्रश्नासंदर्भात आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कर्मचाऱ्यांच्या मानधनात १ जुलै २०२१ पासून वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. pic.twitter.com/w9uMvtaUma
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 9, 2021
सामाजिक न्याय विभागांतर्गत राज्यात सुरु असणाऱ्या 2 हजार 388 अनुदानित वसतीगृहात काम करणाऱ्या अधिक्षक, स्वयंपाकी, मदतनीस आणि चौकीदार अशा एकूण 8 हजार 104 कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यभरातील अनुदानित वसतीगृहात काम करणाऱ्या २ हजार ३८८ अधीक्षकांचं मानधन दहा हजार रुपये, 2 हजार 858 स्वयंपाकींचं मानधन आठ हजार रुपये, तर 470 मदतनीसांचं आणि 2 हजार 388 चौकीदारांचं मानधन प्रत्येकी साडेसात हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिलीय.