महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जून । इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. पहिली लढत लॉर्ड्स मैदानावर झाली. ही लढत ड्रॉ झाली होती. आता दुसरी कसोटी एजबेस्टन येथे उद्या १० जूनपासून सुरू होईल.
विलियमसनच्या कोपराला दुखापत झाली आहे. दुसऱ्या कसोटीनंतर न्यूझीलंडला भारताविरुद्ध WTC फायनल खेळायची असल्याने त्यांनी कोणताही धोका न पत्करण्याचे ठरवले आहे. केन दुसऱ्या कसोटीत खेळणार नसला तरी भारताविरुद्धच्या फायनल सामन्यात तो संघाचे नेतृत्व करेल असे न्यूझीलंड संघाने म्हटले आहे. मार्च महिन्यानंतर तो प्रथमच कसोटी सामन्याला मुकणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत केनला पहिल्या डावात १३ तर दुसऱ्या डावात फक्त एक धाव करता आली होती.
साऊदम्प्टन येते १८ जूनपासून होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. आम्हाला विश्वास आहे की तो अंतिम सामन्यापूर्वी फिट होईल, असे मुख्य कोच गॅरी स्टीड यांनी सांगितले.दुसऱ्या कसोटीत स्टार फिरकीपटू मिशेल सॅटनर दुखापतीमुळे खेळणार नाही. मिशेलच्या इंडेक्स फिंगरला दुखापत झाली आहे.