आगामी दिवसात भरपूर पाऊस; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, ; कृषी तज्ञांच आवाहन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जून । बुलढाणा । आगामी खरीप हंगाम लक्षात घेता गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीस घाई करु नये, आगामी चार दिवसात जिल्ह्यात व राज्यात भरपूर पाऊस अपेक्षित आहे असं आवाहन कृषी तज्ज्ञांनी केलं आहे. जवळपास 70 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय किंवा जमिनीत चांगल्याप्रकारे ओलावा निर्माण झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करु नये असं आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे हवामान जाणकार मनिष येदुलवार यांनी केलंय.

जिल्ह्यात सध्या सरासरी 34.6 इतका पाऊस पडला असून अनेक तालुक्यात पेरणी योग्य पाऊस झाला नसूनही काही शेतकरी पेरणी करायला उत्सुक आहेत. जमिनीत सध्या उष्णता असल्याने कमी पाऊस झाल्यावर पेरणी करणे म्हणजे बियाण्याची उगम क्षमता कमी होते व बियाणे वाया जाऊन दुबार पेरणी करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता संयम ठेवावा व योग्य वेळी पेरणी करावी असं आवाहनही करण्यात आलं आहे.

पेरणी कधी करावी?
साधारणतः 70 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर जमिनीत एक फुटांपर्यंत ओलावा निर्माण होतो. तो आल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. अन्यथा बियाणे वाया जाऊन दुबार पेरणीची शेतकऱ्यांवर वेळ येऊन आर्थिक नुकसान होतं. त्यामुळे आगामी दिवसात पावसाळा चांगला असल्याने शेतकऱ्यांनी संयम ठेवावा असं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान मुंबईत मान्सूनच आगमन झाल्यावर विदर्भ व्यापण्यास मान्सूनला पुढील तीन ते चार दिवसांचा वेळ लागतो. त्यापूर्वी विदर्भात मान्सूनपूर्व पाऊस बरसतो. हा पाऊस जमिनीतील उष्णता घालविण्यास मदत करतो व त्यानंतर 10 जून नंतर जमीन थंड झाल्यावर पेरणी केल्यास उगवण चांगल्या प्रकारे होऊन पीक परिस्थिती चांगली होते. जिल्ह्यात सरासरी 761 मि.मी. पाऊस पडतो. त्यामुळे जिल्ह्यात यावर्षी 7 लाख 38 हेक्टरवर खरीपाच पेरणी नियोजन करण्यात आलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *