महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जून । सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी इंधन दरात आज (शुक्रवार) वाढ केली. ताज्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल दराने 102 रुपयांची पातळी ओलांडली आहे. जागतिक बाजारपेठेत क्रूड तेलाचे दर 72 डॉलर्स प्रती बॅरलपर्यंत पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर इंधन दरात 28 ते 29 पैशांची वाढ झाली आहे.
देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे लीटरचे दर 95.85 रुपयांवर गेले असून, डिझेलचे दर 86.75 रुपयांवर गेले आहेत. मुंबईत हेच दर क्रमशः 102.04 आणि 94.15 रुपयांवर गेले आहेत. देशाच्या सर्वच भागात इंधनाचे दर सर्वकालीन उच्चांकी स्तरावर गेले आहेत. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोलने 105 रुपयांचा तर डिझेलचे 98 रुपयांचा स्तर ओलांडला आहे.
पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीमुळे आगामी काळात महागाईचा मोठा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशातील अन्य महानगरांचा विचार केला तर चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 97.19 रुपयांवर पोहोचले असून, डिझेलचे दर 91.42 रुपयांवर गेले आहेत. प. बंगालमधील कोलकाता येथे हेच दर क्रमशः 95.80 आणि 89.60 रुपयांवर गेले आहेत.