महाराष्ट्र २४ : दिल्लीत अरविंद केजरीवाल ‘वॉल’ बनून उभे ठाकले असून ‘आप’च्या झाडूपुढे भाजप व काँग्रेसचा पुन्हा एकदा सफाया झाल्याचे आतापर्यंतच्या मतमोजणीतून स्पष्ट झाले आहे. या निकालांवर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला दोष देत तीनपेक्षा एकजरी जागा जास्त जिंकली तरी भाजपसाठी हा विजयच आहे, असं म्हटलं आहे.
दिल्लीतील मतमोजणीचे सध्याचे चित्र पाहता आपचे निर्विवाद वर्चस्व राहील, हे स्पष्ट झालं आहे. गेल्या निवडणुकीत ६७ जागा जिंकणाऱ्या आपने पुन्हा मुसंडी मारत ६३ जागांवर आघाडी घेतली आहे. दुसरीकडे गेल्या निवडणुकीत ३ जागा जिंकणाऱ्या भाजपचे ७ उमेदवार आघाडीवर आहेत. ७० सदस्यीय दिल्ली विधानसभेत काँग्रेसची पाटी यावेळीही कोरीच राहणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील भाजपच्या या पराभवावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राचा दाखला दिला.
भाजपला पराभूत करण्यासाठी व सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसकडून देशभरात तडजोडीचं राजकारण केलं जात आहे. महाराष्ट्रातही पक्षाची विचारधारा बाजूला ठेवत काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला व सत्ता स्थापन केली. दिल्लीच्या निकालांकडेही मी तसंच पाहत आहे. शीला दीक्षित यांच्याकडे नेतृत्व असताना संपूर्ण दिल्लीवर काँग्रेसचं वर्चस्व होतं. मात्र त्यांच्या पश्चात काँग्रेसचा प्रभाव पूर्णपणे ओसरला आहे. त्यातही यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने शेवटच्या चार दिवसांत शस्त्रे खाली टाकली. भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने आपली मते आपकडे वळवली, असा दावा पाटील यांनी केला.