राज्यातील अडीच हजार विद्यार्थी सहजपणे ऑनलाइन शिकताहेत जर्मन-जपानी भाषा;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जून । कोरोना काळामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या ‘झेडपी लाइव्ह एज्युकेशन’ उपक्रमांतर्गत राज्यातील लाखो मुलांना घरबसल्या मोफत शिक्षण दिले. आता याच उपक्रमांतर्गत १५ वर्षांपर्यंतच्या सुमारे अडीच हजार मुलांना जर्मनी आणि जपानी भाषेचे ऑनलाइन मोफत शिक्षण दिले जात आहे. इंग्लंडहून चैत्राली पानसे जपानी व जर्मनीहून केदार जाधव जर्मन भाषा सोप्या पद्धतीने शिकवत आहेत. या दहा दिवसांच्या उपक्रमाचे शुक्रवारी उद््घाटन झाले.

औरंगाबादचे गजेंद्र बोंबले व नितीन अंतरकर या जि.प. शिक्षकांनी १३ जुलै २०२० रोजी ‘झेडपी लाइव्ह एज्युकेशन’ या अॅपची निर्मिती केली. ४५० शिक्षकांनी पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांचा अभ्यासक्रम तीन महिन्यांत या ऑनलाइन शिक्षणाद्वारे पूर्ण केला. सोबतच रोबोटिक्स, स्पर्धा परीक्षा, स्पोकन इंग्लिश आदी विषयांचेही सेशन घेण्यात आले.

रोज सकाळी १० ते ११ केदार जाधव जर्मनीहून व सायंकाळी ६ ते ७ लंडनहून चैत्राली पानसे जपानी भाषा शिकवतात. दोन्ही सेशन अॅपसोबतच झूम व यूट्यूबवरील ‘झेडपी लाइव्ह एज्युकेशन’ या चॅनलवर मराठीतून होताहेत. त्यात स्कूल अँड फ्रेंड्स, शॉपिंग, हॉटेल-रेस्टॉरंट, बस-ट्रेन, बर्थडे पार्टी, प्लॅनिंग अ ट्रीप, हेल्पिंग अदर्स अशा १० विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे.

तंत्रज्ञानाचा विचार केल्यास जगामध्ये जर्मनी आणि जपान हे देश आघाडीवर आहेत. जपानी भाषेत नोकरीच्या खूप संधी आहेत. तसेच जर्मनीमध्ये पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते. केवळ जर्मन भाषा आली पाहिजे हीच त्यांची अट असते. त्यामुळे शिक्षणासोबतच नोकरीच्याही संधी आहेत. भविष्यात फ्रेंच आणि कोरियन भाषेचे सेशन घेण्याचे नियोजन असल्याचेही गजेंद्र बोंबले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *