पालखीसोबत येणाऱ्या वारकऱ्यांचे लसीकरण करुनच पंढरपूरमध्ये प्रवेश द्यावा, नगराध्यक्षांची मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जून । यंदा आषाढी यात्रा पायी होणार की बसने याचा घोळ केव्हाही सुटो मात्र पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या महाराज आणि वारकऱ्यांचे लसीकरण करूनच त्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश द्यावा अशी मागणी पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधना भोसले यांनी केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फार मोठा फटका पंढरपूर परिसराला बसल्याने यंदा गेल्यावर्षी प्रमाणे प्रातिनिधिक स्वरूपातच वारी करण्याची भूमिका पंढरपूर मधील नागरिकांची आहे.

संतांच्या मानाच्या सातही पालखी सोहळे थांबत असलेले मठ हे प्रदक्षिणा मार्गावर असून शहराची सर्वात जास्त लोकसंख्या प्रदक्षिणा मार्गाच्या आतल्या बाजूस आहे. यामुळे येणारे वारकरी लसीकरण करून आले तर नागरिकांना धोका कमी वाटेल अशी भूमिका नगराध्यक्ष साधना भोसले यांनी व्यक्त केली. अशाच पद्धतीची भूमिका प्रदक्षिणा मार्गावरील कुटुंबांनी देखील मांडली आहे.

अजूनही पंढरपूरमध्ये कोरोना आणि म्युकरमायकोसिसचे रोज नवनवीन रुग्ण सापडत आहेत. आत्तापर्यंत पंढरपूरमध्ये 24731 कोरोनाचे रुग्ण सापडले असून सध्या 555 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे अधिकृत सरकारी आकड्यानुसार आतापर्यंत 480 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे 419 रुग्ण सापडले असून यात 35 जणांचा मृत्यू झाला असल्याने नागरिकांत अजूनही कोरोनाची दहशत कायम आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *