कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची तुफानी इनींग ; एका रात्रीच्या पावसाने पंचगंगा पात्राबाहेर !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जून । कोल्हापूर जिल्ह्यात काल (ता.१७) रात्रीपासून पावसाची तुफानी बॅटिंग सुरु आहे. एका रात्रीच्या पावसाने पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडली आहे. जिल्ह्यतील ३० हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कागल तालुक्‍यातील बाचणी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेला. यामुळे वाळवा – बाचणी परिसरातून कोल्हापूरला जाणारी वाहतूक बंद झाली. तसेच खेबवडे ओढ्याच्या दोन्ही बाजूला पाणी आल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे.

चंद्रे आणि माजगाव गावाच्या दरम्यान असलेला रस्ता पहिल्‍याच पावसाने वाहून गेला. यामुळे गारगोटी- कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली. या मार्गावर ओढ्यावरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्‍यामुळे वाहतुकीस पर्यायी रस्‍ता तयार करण्यात आला होता. दरम्‍यान पहिल्‍याच मुसळधार पावसामुळे हा रस्‍ताच वाहून गेला. परिणामी या मार्गावरील वाहतूक बंद झाली. याचा परिणाम दूधाचे टँकर आणि भाजीपाला वाहतुकीवर झाला आहे. हा मार्ग वाहतूकीस बंद झाल्‍याने दूधाचे टँकर अडकून पडले आहेत.

दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या पावसाने बुधवारी मध्यरात्रीपासून जोर पकडला. रात्रीपासून जोरदार सरी कोसळत होत्या त्यामुळे ओढे, नाले, नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत होती. पंचगंगेच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ झाल्याने बुधवारी नऊच्या सुमारास राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. रात्रीची बंधाऱ्यावरील पाणीपातळी १३. ६ फूट होती. सकाळपर्यंत पाणीपातळी वेगाने वाढली आहे.

सळधार पावसाने वेदगंगेला पूर आला आहे. कागल तालुक्यातील या नदीवरील बस्तवडे, नानीबाई चिखली, सुरुपली व कुरणी हे चारही बंधारे पाण्याखाली गेले असून बाणगे व निढोरी पुलावरून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *