महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जून । कोरोना संकटाच्या काळात अनेकांनी आपले नातेवाईक, मित्र, जवळच्या व्यक्तींना गमावलं. काही लहानग्यांनी तर आपले आई-वडील अशा दोघांनाही गमावलं आहे. अशा कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी पुणे प्रशासनानं एक महत्वाचा निर्णय घेतलाय. कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई-वडिलांच्या संपत्तीवर बालकांचाच हक्क राहील, असा निर्णय पुणे प्रशासनाकडून घेण्यात आलाय. पुणे जिल्ह्यातील 26 बालकांनी आपल्या दोन्ही पालकांना गमावलं आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनानं हा निर्णय घेतल्याची माहिती दिलीय. (Children’s right to the property of the parents who died due to corona)
कोरोनामुळे जीव गेल्यानंतर अनेक मुलं अनाथ बनली आहेत. अशा अनाथ मुलांच्या नातेवाईकांकडून त्यांच्या संपत्तीवर अधिकार सांगितला जात असल्याचे प्रकार समोर आल्याची माहिती मिळतेय. त्या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनानं घेतलेला निर्णय महत्वाचा आहे. पुणे जिल्ह्यात 26 बालकांनी आपल्या आई-वडिल अशा दोन्ही पालकांना गमावलं आहे. अशा बालकांच्या संपत्तीचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेनं त्या बालकांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश पुणे प्रशासनानं दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तशी माहिती दिलीय. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना बाल संगोपन योजनेअंतर्गत मदत मिळावी यासाठी टास्क फोर्सची स्थापनाही करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या संगोपनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी सरकारकडून कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मदत देण्यासाठी एखादी योजना सुरु करण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या नावे राज्य सरकारकडून 5 लाखांची रक्कम मुदत ठेव म्हणून बँकेत जमा करण्यात येणार आहे. या मुलांना ही मदत 21 व्या वर्षी व्याजासह मिळणार आहे. या निर्णयाच्या माध्यमातून अनाथ झालेल्या मुलांचे अश्रू पुसण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून केले जात आहेत.