देशाच्या आर्थिक विकासात बँकाची महत्त्वाची भूमिका: राष्ट्रपती रामनाथ कोविंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ -पुणे : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट (एनआयबीएम)संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात राम नाथ कोविंद बोलत होते. देशाच्या आर्थिक विकासात बँका महत्त्वाची भूमिका पार पाडत असून सार्वजनिक पैशाचे संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी बँकांकडे आहे.त्याचप्रमाणे जनतेचा बँकेवर असलेला विश्वास अबाधित ठेवण्यासाठी बँकांनी कायम प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. तसेच देशाच्या वाढत्या अर्थ व्यवस्थेचा विचार करता जगातील पहिल्या 100 बँकांच्या यादीत भारतातील एका बँकेचे नाव यावे, असे ध्येय आपण ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी केले.
यावेळी राष्ट्रपती कोविंद यांच्या पत्नी सौ.सविता कोविंद,राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,राज्याचे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास, एनआयबीएमचे संचालक डॉ. के. एल. धिंग्रा आदी उपस्थित होते.
राष्ट्रपती कोविंद म्हणाले, देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यामध्ये बँकांनी उत्कृष्ट भूमिका बजावली आहे. बँक व्यवस्थापनात संशोधन, प्रशिक्षण, शिक्षण आणि सल्ला यासाठी स्वायत्त शिखर संस्था म्हणून एनआयबीएम महत्त्वाचे काम करत .तसेच एनआयबीएममध्ये चांगल्या संशोधन सुविधा असून या सुविधांचा उपयोग गरीब घटकांसाठी आर्थिक उत्पादने तयार करण्यासाठी केला पाहिजे. त्याचप्रमाणे जागतिकस्तरावरील कुशल मन्युष्यबळ एनआयबीएममधून तयार व्हावे. त्याचप्रमाणे देशातील अर्थिक असमानता दूर करण्यासाठी बँकांनी काही भौगोलिक भाग दत्तक घ्यावा.माहिती व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संशोधन करून बँक व्यवस्थेत आवश्यक सुधारणा कराव्यात,अशी अपेक्षाही कोविंद यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते एनआयबीएम संस्थेच्या कार्याच्या माहिती पुस्तिकेचे, टपाल तिकीटाचे व संस्थेच्या नव्या लोगोचे अनावरण करण्यात आले.यावेळी आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आर्थिक क्षेत्रात राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. के. एल. धिंग्रा यांनी केले.*
दिव्यांग व्यक्तींना सोयीसुविधा द्या.
देशाच्या एकूण लोकसंख्येच्या दोन टक्के लोक दिव्यांग असून या दिव्यांग व्यक्तींमध्ये प्रचंड क्षमता आहे. दिव्यांग व्यक्तींना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. आरबीआयने ‘दिव्यांग’ व्यक्तींना बँकिंग सुविधांमध्ये सहज प्रवेश मिळण्यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसिध्द केल्या आहेत. दिव्यांग व्यक्तींना बँकेतील सर्व सेवा अधिक चांगल्या पध्दतीने मिळाव्यात यासाठी आरबीआयने स्वत: पुढाकार घ्यावा, असेही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *