महाराष्ट्र २४ – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आता ५ दिवसांचा आठवडा असणार आहे. या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २९ फेब्रुवारीपासून होणार आहे.
केंद्राप्रमाणेच राज्यातही ५ दिवसांचा आठवडा करावा, असा सूर सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून व्यक्त करण्यात आला होता. या मागणीची राज्य सरकारने दखल घेत पाच दिवसांचा आठवडा केला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या रोजच्या कामाची ४५ मिनिटे वाढवून ५ दिवसांचा आठवडा करता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत म्हटले होते. आता या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
मंत्रिमंडळ निर्णय
१. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ५ दिवसांचा आठवडा २९ फेब्रुवारीपासून.
२. इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे नाव आता “बहुजन कल्याण विभाग”.
३. बाल न्याय निधी गठीत करण्यास मान्यता. २ कोटींची तरतूद.
४.राज्याच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.