दोषींना तत्काळ फासावर चढवा, निर्भयाच्या आईला अश्रू अनावर

Spread the love

महाराष्ट्र २४; नवी दिल्ली: कायद्याच्या पळवाटा शोधत फाशीच्या शिक्षेपासून वाचू पाहणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील चारही दोषींविरुद्ध डेथ वॉरंट काढण्याची मागणी निर्भयाच्या आईनं केलीय. दोषींना तत्काळ फासावर चढवा, असं म्हणताना बुधवारी न्यायालयात निर्भयाच्या आईला आपले अश्रू अनावर झाले. आपण न्यायासाठी गेल्या सात वर्षांहून अधिक काळापासून खेटे घालत असल्याचंही त्यांनी न्यायाधीशांसमोर म्हटलं. ‘दोषींविरुद्ध तत्काळ डेथ वॉरंट जारी केलं जावं, अशी मी हात जोडून मागणी करतेय’ असं म्हणताना आपल्याच परिस्थितीवर निर्भयाच्या आईला रडू कोसळलं. यानंतर कोर्टाच्या बाहेर मीडियाशी बोलतानाही त्यांचे अश्रू थांबत नव्हते.

निर्भयाच्या दोषींसाठी नवं डेथ वॉरंट जारी करण्यात यावं, या मागणीसाठी निर्भयाच्या आई-वडिलांनी आणि दिल्ली सरकारनं दाखल केलेल्या नव्या याचिकेवर बुधवारी दिल्ली न्यायालयात सुनावणी पार पडली. दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकूण घेतल्यानंतर न्यायाधीशांनी गुरुवारपर्यंत ही सुनावणी पुढे ढकलली आहे

सुनावणीसाठी न्यायालयात दाखल झालेली निर्भयाची आई यावेळी खूपच भावुक झालेली दिसली. मी गेल्या वर्षभरापासून दोषींना फासावर चढवण्याची तारीख निश्चित केली जावी म्हणून प्रयत्न करतेय. मीही एक आई आहे. गेल्या सात वर्षांपासून न्यायाची वाट पाहतेय. मी तुमच्यासमोर हात जोडते, असं म्हणताना त्यांनी आपले अश्रू आवरणं कठिण झालं होतं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *