महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जून । जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या एडीशनचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पहिल्या एडीशनमध्ये दोन वर्ष वेगवेगळ्या देशाच्या संघांना पराभवाचे पाणी पाजणाऱ्या टीम इंडियाला अंतिम सामन्यात मात्र न्यूझीलंडकडून पराभव सहन करावा लागला होता. न्यूझीलंडने 8 विकेट्सने पराभूत केल्याने पहिल्या जागतिक कसोटी अजिक्यपद स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न भंगले होते.
न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाने आता दुसऱ्या अजिंक्यपदावर आपला फोकस केला आहे. दुसरी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जुलै 2021 ते 2023 दरम्यान खेळली जाणार आहे. या दरम्यान टीम इंडिया कसोटी मालिका खेळणार असून यातील तीन कसोटी मालिका घरच्या मैदानावर, तर तीन विदेशात खेळणार आहे.
फ्यूचर प्रोग्रामनुसार, टीम इंडियाचा संघ 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या एडीशनची सुरुवात करणार आहे. इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या या मालिकेनंतर न्यूझीलंडचा संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेत व्हाईटवॉश देऊन अंतिम लढतीतील पराभवाचा बदला घेण्याची संधी टीम इंडियाकडे आहे.
न्यूझीलंडविरुद्ध यजमानपद भूषवल्यानंतर टीम इंडिया तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान ही मालिका होईल. यानंतर 2022 च्या सुरुवातीला श्रीलंकेचा संघ हिंदुस्थानच्या दौऱ्यावर तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी येईल.यानंतर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया भिडणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी हिंदुस्थान दौऱ्यावर येईल. त्यानंतर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ बांग्लादेश दौऱ्यावर जाणार आहे.